LEOPARD ATTACK | लांडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी!

मंचर : पुढारी वृत्तसेवा : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील विश्वासमळा येथे दुचाकीवरून घरी जात असताना दुचाकीवर मागे बसलेल्या शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ही महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी( दि. 29) सायंकाळी साडेसात वाजता घडली.

मयूरा नवनाथ विश्वासराव, असे जखमी महिलेचे नाव आहे. मयूरा विश्वासराव व त्यांचे कुटुंबीय शेतात टोमॅटो तोडण्याचे काम करत होते. मुलगा समर्थ व मयूरा हे दोघे दुचाकीवर कॅरेट आणण्यासाठी घरी जात होते. त्या वेळी रस्त्याच्या बाजूला बाजरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर मागे बसलेल्या मयूरा यांच्यावर झेप घेतली.

त्या सावध असल्याने त्यांनी दुचाकीला घट्ट पकडून ठेवले व मुलगा समर्थ यास दुचाकीचा वेग वाढवण्यास सांगितला. त्यामुळे बिबट्या रस्त्याच्या डाव्या बाजूला पडला. मात्र, या हल्ल्यात बिबट्याचा पंजा मयूरा यांच्या डाव्या पायाला लागला. त्यात त्या जखमी झाल्या. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मयूरा यांची भेट घेत घटनेची माहिती घेतली. हल्ला झालेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर असून, त्या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच संगीता शेवाळे यांनी केली आहे.

हेही वाचा

2024-05-02T02:52:34Z dg43tfdfdgfd