KOLHAPUR NEWS: कोल्हापुरात राहत्या घरात 4 फूट खोल खड्डा खोदून सुरू होती पूजा, गुप्तधनाच्या लालसेपोटी....

>> समीर मुजावर, प्रतिनिधी कोल्हापूरKolhapur Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात गुप्त धनाच्या लालसेपोटी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राहत्या घरात चार ते पाच फूट खड्डा खोदून ही अघोरी पूजा सुरू होती. या घटनेची माहिती गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांनी पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. दरम्यान, याप्रकरणी सहा संशयितांना मंगळवारी मध्यरात्री पोलीसांनी अटक केली. गुप्त धनाच्या लालसेपोटी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील कौलव गावचा शरद धरम्मा कांबळे या युवकाने आपल्या राहत्या घरात गुप्तधन प्राप्तीसाठी अघोरी कृत्य काही दिवसांपासून सुरू केले होते. त्याने त्याच्या राहत्या घरी देवाच्या समोर चार ते पाच फुटाचा खड्डा मारला होता. तसेच त्याने काही मांत्रिकासोबत विधिवत पूजा सुरु केली होती. सदरचा हा प्रकार सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ या प्रकाराची माहिती राधानगरी पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी राधानगरी पोलिसांनी दाखल होत संशयित शरद धर्मा माने (रा. कौलव), महेश सदाशिव माने (रा. राजमाची ता.कराड), अशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ (दोघे रा. मंगळवार पेठ, ता. कराड), संतोष निवृत्ती लोहार (रा.वाझोली ता.पाटण),कृष्णात बापु पाटील (रा.पुलाची शिरोली ता.हातकणगले) या संशयित आरोपींना अटक केली

असा उघडकीस आला प्रकार

सरपंच कुंभार, माजी उपसरपंच व फिर्यादी अजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या घरात काही धार्मिक विधी केल्या जात होत्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घरात थेट प्रवेश केला. त्यावेळी एका चटईवर काही वस्तू ठेवून मांत्रिक पुजा करत असल्याचे निदर्शनास आले. गळ्यात रुद्राक्ष आणि वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेला संशयित चंद्रकांत धुमाळ हा काही मंत्रोउच्चार करत होता. त्याच्या शेजारी संशयित आरोपी शरद माने बसलला होता.

आतील खोलीत गेलो असता तेथे देवघराच्या समोर अंदाजे चार ते पाच फुटाचा खड्डा खोदण्यात आला होता. फिर्यादी पाटील यांनी आरोपींना याबाबत विचारले असता संशयित संतोष लोहार याने या खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे त्यासाठी ही पुजा करत आहोत असे सांगितले. तर संशयित आशिष चव्हाण याने सरपंच आणि इतरांना येथुन निघुन जा नाहीतर तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अजित पाटील यांनी पोलिसांत याबाबत फिर्याद दिली.

2024-07-03T14:55:36Z dg43tfdfdgfd