IRCTC TICKET BOOKING: वेगळे आडनाव असलेल्या नातेवाईकांचे रेल्वे तिकीट बुक करणे अवैध? IRCTC ने दिले स्पष्टीकरण

IRCTC Online Ticket Booking: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही देखील प्रवास करत असाल आणि त्यासाठी तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रेल्वे तिकीट बुकिंगबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या एका दाव्यात तुम्ही तुमच्याशिवाय इतर नातेवाईकांचे तिकट बुक करू शकत नाही असे म्हटले जात आहे.

तसेच तिकिट बुक करणाऱ्याचे आडनाव तिकिंट बुकिंग केलेल्या प्रवाशापेक्षा वेगळे असेल तर तो एकत्र बुकिंग करू शकणार नाहीत असे म्हटले जात होते. तसेच तुम्ही तुमच्या आयडीवरून वेगळ्या आडनावाच्या व्यक्तीसाठी तिकीट बुक करू शकत नाही असे केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो असा देखील दावा केला जात होता. परंतु ही सर्व माहिती चुकीची असून IRCTC ने याची दखल घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

आयआरसीटीसीने एक्स या सोशळ मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोशल मीडियावर ई-तिकीट बुकिंगबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. या केवळ अफवा असून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे. IRCTC ने पुढे स्पष्ट केले की तुम्ही वेगवेगळ्या आडनाव असलेल्या लोकांसाठी ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. तुम्ही तुमच्या IRCTC खात्यातून एकाच वेळी कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसाठी तिकीट बुक करू शकता.

सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जात होता की, जर प्रवाशांची आडनाव वेगळी असेल तर त्यांना एकत्र तिकीट मिळणार नाही. परंतु तुमचे आडनाव पूर्णपणे वेगळे असले तरीही तुम्ही तिकीट बुक करू शकता असेही आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे. तसेच तुम्ही पूर्वीप्रमाणे तुमच्या IRCTC खात्यातून दर महिन्याला 12 तिकिटे बुक करू शकता असेही आयआरसीटीसीने सांगितले आहे. पण जर तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक केले असेल तर तुम्ही एका महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकता असेही आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे.

आयआरसीटीसीने पुढे म्हटले की, तुम्ही तुमचा वैयक्तिक आयडी वापरून मित्र, कुटुंब आणि नातेवाईकांसाठी तिकीट बुक करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की वैयक्तिक आयडीद्वारे बुक केलेली तिकिटे केवळ तुमच्या वैयक्तिक वापरासाठी असतात आणि ती विकली जाऊ शकत नाहीत. तुम्ही ही तिकिटे विकण्याचा प्रयत्न केल्यास ते बेकायदेशीर असेल आणि तो रेल्वे कायदा 1989 च्या कलम 143 नुसार गुन्हा मानला जाईल.

2024-06-26T18:11:31Z dg43tfdfdgfd