INCOME TAX ON GOLD JEWELLERY : दागिन्यांच्या विक्रीवर द्यावा लागणार नाही कर, आयकराचे हे कलम समजून घ्या

मुंबई : दागिन्यांच्या विक्रीवर तुम्हाला भांडवली नफा कर भरावा लागेल. मात्र, असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही हा भांडवली नफा कर भरणे टाळू शकता. यासाठी तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 54F अंतर्गत कर सूट मिळेल. या कलमात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने मालमत्ता विकली आणि घर खरेदी करण्यासाठी मिळालेली संपूर्ण रक्कम वापरली तर तो कर सवलतीचा दावा करू शकतो. या संपत्तीमध्ये शेअर्स आणि बाँड तसेच दागिने आणि सोने यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की तुम्ही दागिने विकले आणि मिळालेली संपूर्ण रक्कम घर खरेदीमध्ये गुंतवली तर तुम्ही कर भरणे टाळू शकता.

अलीकडेच, बेंगळुरूच्या आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (ITAT) देखील हा नियम स्पष्ट केला आहे. न्यायाधिकरणासमोर एक खटला आला ज्यामध्ये एका व्यक्तीने वारसाहक्काने दिलेले दागिने विकून पैसे घराच्या मालमत्तेत गुंतवले होते. मात्र, मूल्यांकन अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला कलम 54F अंतर्गत सूट देण्यास नकार दिला होता आणि दागिन्यांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर कराची मागणी केली होती.

हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने बेंगळुरूस्थितआयकर अपीलीय न्यायाधिकरणाने त्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय दिला आणि कलम 54F अंतर्गत दीर्घकालीन भांडवली नफा करावर सूट मिळण्यास तो पात्र असल्याचे सांगितले. याशिवाय वारसाहक्काने मिळालेले सोने आणि दागिने विकूनही तुम्ही या कर सवलतीचा लाभ घेऊ शकता, हेही या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे.

सध्याच्या नियमांनुसार, तुम्ही दागिने 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवल्यानंतर विकल्यास तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल हा दर सध्या 20 टक्के आहे. तुम्ही 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत दागिने विकले तर तुम्हाला अल्पकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल, जो आयकर स्लॅबनुसार भरला जातो.

मात्र, एखाद्या व्यक्तीने दागिन्यांची विक्री केल्यानंतर एक वर्ष आधी किंवा दोन वर्षांनी घर खरेदी केले असेल तरच कलम 54F अंतर्गत लाभ मिळू शकतो. लाभ मिळवण्यासाठी दागिने विकल्यापासून 3 वर्षांच्या आत त्याच्या घराच्या मालमत्तेचे बांधकाम पूर्ण केले पाहिजे. याशिवाय, हे देखील लक्षात घेतले पाहिजे की ही सूट केवळ निवासी मालमत्तेवर आहे. मालकीची व्यावसायिक मालमत्ता असल्यास तुम्ही या कर सवलतीचा लाभ घेऊ शकत नाही.

2024-05-02T07:17:17Z dg43tfdfdgfd