CRIME NEWS : युवकाचे अपहरण करून 4 लाख 70 हजार लुटले

पुणे- नगर महामार्गावर सणसवाडी (ता. शिरूर) येथे एकाला कारमध्ये बसवून अपहरण करून व त्याचे महिलेसोबत फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच नातेवाईकांकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे मागवून घेऊन 4 लाख 70 हजार रुपयांची लूट करण्यात आली. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक केली आहे.

राहुल सुखदेव गायकवाड (वय 34, रा. कुकडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), विकास प्रकाश थिटे (वय 26, रा. चौधरी वस्ती पाबळ, ता. शिरूर), अर्चना अविनाश पठारे (वय 34, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) आणि समिर प्रकाश शेलार (वय 21, रा. निमोणे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबत संदीप जिजाबा ताठे (रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे (ता. शिरूर) येथील संदीप ताठे यांना 8 सप्टेंबर रोजी अर्चना पठारे या महिलेने फोन करून तुम्ही पैशांची मदत करू शकता का असे विचारले. त्यावेळी ताठे यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगत फोन कट केला. त्यानंतर दोन दिवसांनी महिलेने फोन करून माझे वाघोलीत घर आहे, ते घ्या व मला पाच लाख रुपये द्या असे म्हणून वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ताठे महिलेचा फोन टाळू लागले. त्यानंतर बुधवारी (दि. 11) ताठे पुण्याला जात असताना अर्चना यांनी फोन करून सणसवाडी येथील एल अँड टी फाट्याजवळ असल्याचे सांगून ताठे यांना बोलावले. या वेळी ताठे कारमधून जात असताना अर्चना यांच्यासह राहुल गायकवाड, विकास थिटे हे कारजवळ आले. त्यांनी संदीप ताठे यांना बाहेर बोलावून दुसर्‍या कारमध्ये बसवून वाघोली येथील एका ठिकाणी घेऊन जाऊन अर्चना पठारेसोबत संदीप ताठे यांचे फोटो काढून घेत फोटो व्हायरल करण्याची तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण केली.

या वेळी संदीप ताठे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठ्या तसेच रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर संदीप यांच्या क्रेडिट कार्डचा पिन घेऊन त्यातून पैसे काढले, तसेच संदीप यांच्या नातेवाइकांना फोन करून ऑनलाइन पैसे मागवून घेऊन संदीप यांची तब्बल 4 लाख 70 हजार रुपयांची लूट केली. या सर्व प्रकारानंतर संदीप ताठे याला पुन्हा सणसवाडी येथे आणून सोडून दिले व पोलिसांत गेला तर जिवे मारून टाकू अशी धमकी दिली.

दरम्यान या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी तीनही आरोपींना अटक केली; मात्र याबाबत तपास करत असताना निमोणे गावातील समीर शेलार यानेच आपल्या गावातील संदीप ताठे याच्याकडे पैसे व सोने असल्याचे सांगून लुटण्यास सांगितल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी समीर शेलार यालादेखील अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करीत आहेत.

2024-09-16T10:51:11Z dg43tfdfdgfd