CRIME NEWS | माथाडीच्या वादातून मॉलच्या गेटवर गोळीबार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिस यंत्रणा व्यस्त असताना एकाने माथाडीच्या वादातून वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केला. ही घटना मंगळवारी (दि. १७) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. बाळा शिंदे (३०, रा. राधाकृष्ण कॉलनी, वाकड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तर, त्याचा साथीदार कारचालक (नाव व पत्ता माहिती नाही) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिजित अमृत राठोड (१९, रा. रशिदवाडी, पुनावळे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, असे गुन्हे दाखल आहेत.

वाकड येथे फिनिक्स मॉल आहे. या मॉलमध्ये शिंदे पूर्वी माथाडीचे काम करीत होता. त्या वेळी त्याने तेथे काही मुलांची नोंद करून त्यांना कामाला लावले होते. आपल्या काही मुलांना माथाडीमध्ये काम मिळावे, असे त्याचे म्हणणे होते; मात्र काम मिळत नसल्याचा त्याला राग होता.

मॉलच्या पाठीमागील बाजूच्या साहित्य वाहतूक करण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आरोपी शिंदे हा एका सफेद रंगाच्या कारमधून आला. कारमधून उतरून तो काही वेळ थांबला. त्यानंतर फिर्यादी अभिजित यांना उद्देशून तुम्ही येथे काम कसे करता, मी तुमच्याकडे बघून घेतो. येथे काम केले तर एका-एकाला गोळ्या घालतो.

मी इथला भाई आहे, असे म्हणत धमकावले; तसेच शिवीगाळ करीत आज जर बुवा सापडला असता तर त्याला गोळ्या घातल्या असत्या, असे बोलून कमरेला लावलेले रिव्हॉल्वर काढले आणि अभिजित व त्यांच्या सहकार्याच्या दिशेने गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

गोळीबाराचा आवाज होताच आजूबाजूचे लोक घाबरून पळून गेले. गोळीबार केल्यानंतर आरोपी शिंदे तात्काळ पळून गेला. सीसीटीव्ही कॅमेर्यात घटना कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडली. पोलिसांनी तपास करीत बुधवारी सायंकाळी शिंदे याला ताब्यात घेतले आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद

आरोपी शिंदे हा गोळीबारापूर्वी बराच वेळ तेथील कामगारांशी हुज्जत घालत होता. सुरक्षारक्षकांनी लक्ष देणे बंद केल्यानंतर त्याने हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. ही घटना प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

2024-09-19T07:07:22Z dg43tfdfdgfd