BULLET TRAIN : भारतात बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? रेल्वेनं दिली उत्तर

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची खूप चर्चा आहे. पण या रुटचं काम पूर्ण कधी होईल, याबद्दल माहिती विचारण्यासाठी नुकताच एक आरटीआय अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जाच्या उत्तरात बुलेट ट्रेनचे ट्रॅक तयार करणाऱ्या 'नॅशनल हाय स्पीड रेल कॉरपोरेशन लिमिटेड'ने माहिती दिली आहे. 508 किलोमीटर लांब हा रूट कधी पूर्ण होईल ते आताच सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सुरत व बिलिमोरादरम्यान ट्रायल रन केव्हा होईल?

ते म्हणाले, "ट्रॅकच्या कामासाठी 'व्हायाडक्ट'चा एकूण 35 किलोमीटरचा भाग सोपवला आहे. पूर्ण कॉरिडॉरच्या नागरी कामांसाठी 100 टक्के टेंडर आणि गुजरातमधील ट्रॅकच्या कामांसाठी टेंडर देण्यात आली आहेत. गुजरातमधील सुरत आणि बिलीमोरादरम्यान ट्रायल रन 2026 मध्ये सुरू होईल.'' एनएचएसआरसीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील भागासाठी पहिला सिव्हिल करार मार्च 2023 मध्ये देण्यात आला होता, कारण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा मोठा भाग महाराष्ट्रात उपलब्ध नव्हता.

रेल्वेकडून मागितलं होतं उत्तर

मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौर यांना आरटीआय अर्जातून, एनएचएसआरसीएल संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची शेवटची तारीख सांगण्याच्या स्थितीत आहे की नाही हे रेल्वेकडून जाणून घ्यायचं होतं. यावर "मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याच्या तारखेचा अंदाज सर्व टेंडर/पॅकेज वाटप झाल्यानंतर लावता येईल," असं उत्तर एनएचएसआरसीएलने दिलं.

बुलेट ट्रेनच्या कामासाठी भूसंपादन पूर्ण

या योजनेची सुरुवात 2017 मध्ये झाली होती आणि सुरुवातीला हे डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज होता. पण भूसंपादन व कोविडमुळे कामं रखडली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, सुरत ते बिलीमोरादरम्यानच्या 50 किमी लांबीचे काम ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी घोषणा रेल्वेने केली आहे. यासाठी 100% भूसंपादन झालंय, अशी घोषणा जानेवारी 2024 मध्ये करण्यात आली. एनएचएसआरसीएलने आरटीआय अर्जाच्या उत्तरात म्हटलंय की, अजून रेल्वे ट्रॅक टाकण्यात आलेले नाहीत, पण सहा एप्रिल 2024 पर्यंत एकूण 157 किमी लांबीच्या मार्गावर 'व्हायाडक्ट' (पूल) बांधण्याचं काम पूर्ण झालं आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी बुलेट ट्रेनबद्दल दिलं होतं अपडेट

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कॉरिडॉरच्या कामाच्या प्रगतीची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 28 मार्च रोजी दिली होती. "295.5 किमी ‘पिअर’ आणि 153 किमी ‘व्हायाडक्ट’ बांधण्याचं काम पूर्ण झालंय," असं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं. “पिअर्स हे जमिनीवर उभारलेले मोठे खांब आहेत. त्यावर गर्डर टाकून व्हायाडक्ट तयार केले जातात, असं प्रकल्पाशी संबंधित एका तज्ज्ञाने सांगितलं.

2024-05-04T10:05:55Z dg43tfdfdgfd