BEED LOK SABHA ELECTIONS 2024: पंकजा मुंडे यांचे धाकट्या बहिणीवरून मोठं विधान, म्हणाल्या...

सुकेशनी नाईकवाडे, प्रतिनिधी बीड: Pankaja Munde: देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. ठिकठिकाणी सभांचे आयोजन केले जात आहे. मात्र भाजपने काही ठिकाणी आपले उमेदवार बदलले आहेत त्या ठिकाणी नाराजी आहे. बीड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. याआधी अनेकदा पंकजा मुंडे भाजपामध्ये नाराज असून, पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले असल्याचे समोर आले आहेत.

पंकजा मुंडेंनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्या दररोज सभा, बैठका आणि मेळावे घेत आहेत. अशातच आता बीड येथे पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बीड मधील माने कॉम्प्लेक्स परिसरात प्रचारसभा घेतली. या सभेला संबोधित करताना पंकजा यांनी प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. यावेळी भाषण करताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनी पंकजा मुंडे भावूक झाल्या. 'मी रडून मतदान मागणार नाही, गोपीनाथ मुंडे व्हायची माझी ताकद नाही, मला पंकजा मुंडेच राहू द्या', असे भावनिक विधान पंकजा मुंडे यांनी केले.

पुढे बोलताना पंकजा यांनी, 'मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे यांचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही. तिचे कुठेही अडणार नाही. प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून उभी करेन, असे मोठे विधान केले. या सभेला महायुतीचे आणि घटक पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकमधील उमेदवारीबाबत महायुतीत संभ्रम

नाशिकमध्ये सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मात्र त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. कारण अद्याप त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. शिवसेनेचे नाशिकचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही उमेदवारीबाबत रस दाखवलेला आहे. मात्र तावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी नाशिकमधून छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून जाहीर माघार घेतली आहे. त्यामुळे महायुती आता नव्या उमेदवाराच्या शोधात आहे.

अशातच आता पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देण्याविषयी भाष्य केले आहे. त्यामुळे आता नाशिकमधून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 10 वर्षांपासून प्रीतम या बीडमधून लोकसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे आता त्यांचा नाशिकच्या उमेदवारीसाठी विचार होण्याची शक्यता आहे.

2024-04-25T06:39:11Z dg43tfdfdgfd