संत निवृत्तीनाथ दिंडीतील रामनाथ शिलापूरकर यांचे निधन

नाशिक : त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील दिंडीचे प्रमुख रामनाथ महाराज शिलापूरकर (७८) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या पालखी सोहळ्यात जिल्ह्यातील अनेक वारकरी, दिंड्या सहभागी होतात. शिलापूर येथून रामनाथ महाराज शिलापूरकर यांची दिंडी सहभागी झाली आहे. या दिंडीचे प्रमुख असलेले शिलापूरकर यांचे निधन झाले. ४० वर्षांपासून वारकरी संप्रदायात त्यांचे मोठे कार्य होते. जिल्ह्यात मोठमोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले होते.

हेही वाचा : गंगापूर रोडवरील वादग्रस्त वृक्षांचे पुनर्रोपण? वृक्ष प्राधिकरणाचा प्रस्ताव

विद्यावाचस्पती जगन्नाथ महाराज पवार यांचे ते शिष्य होते. संपत महाराज धोंगडे यांनी, शिलापूरकर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर, महाराष्ट्रात प्रचार व प्रसार केला असून त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली. शिलापूरकर यांच्यावर बुधवारी शिलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुख ज्येष्ठ कीर्तनकार रामनाथ शिलापूरकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबियांना तसेच समस्त वारकरी बांधवांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांना यातून बाहेर पडण्याचे बळ मिळो.

छगन भुजबळ (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री)

2024-07-03T14:57:33Z dg43tfdfdgfd