वृक्षवाढीविषयी गैरसमज

- हेमंत लागवणकर

गेल्या काही दशकांमध्ये कर्बयुक्त पदार्थांचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर झाल्याने वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढले आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात. त्यामुळे वातावरणात या वायूचे प्रमाण वाढले, तर त्यामुळे वनस्पतींची वाढ जलद गतीने होईल, असे मानले जाते. मात्र हा गैरसमज असल्याचे वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियामधील न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात दीर्घ काळापासून केलेल्या प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. तब्बल सहा वर्षे चाललेल्या या प्रयोगांतून केलेल्या निरीक्षणांच्या आधारे काढण्यात आलेले निष्कर्ष विचार करायला लावणारे आहेत.

कार्बन डायऑक्साइड वायूची पातळी वाढली असता, वनस्पतींमध्ये होणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढतो, हे खरे आहे. पण, वनस्पतींच्या वाढीसाठी इतरही पोषकद्रव्ये आवश्यक असतात. जमिनीमधून वनस्पतींना किती प्रमाणात पोषकद्रव्यांचा पुरवठा होतो, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. वनस्पतींना आवश्यक असलेल्या पोषकद्रव्यांमध्ये फॉस्फरस हा एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीमधून फॉस्फरसची मात्रा पुरेशा प्रमाणात मिळाली नाही, तर वनस्पतीच्या वाढीला मर्यादा येतात. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात केलेल्या प्रयोगांवरून हेच अधोरेखित झाले आहे.

शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगांमध्ये नीलगिरीच्या वृक्षांभोवती उंच पाइप उभारून त्यांच्यामधून कार्बन डायऑक्साइड वायू प्रवाहित केला. यामुळे प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढला. त्याचप्रमाणे, वृक्षांच्या मुळांवाटे जमिनीत सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण वाढले. शास्त्रज्ञांचा असा कयास होता की, यामुळे जमिनीत असलेल्या सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियांना चालना मिळून जमिनीत असलेल्या जैविक आणि मृत अवशेषांच्या विघटनातून अधिक प्रमाणात फॉस्फरस उपलब्ध होईल. प्रत्यक्षात जमिनीतील फॉस्फरसचे प्रमाण वाढू शकले नाही. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढूनसुद्धा वनस्पतींची वाढ अपेक्षित प्रमाणात न झाल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले. मात्र, या प्रयोगांतून हाती आलेले निष्कर्ष हे सार्वत्रिक मानता येणार नाहीत, त्यासाठी यासंदर्भात आणखी प्रयोग करण्याची गरज असल्याचे मत अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T06:27:11Z dg43tfdfdgfd