मोदी-शहांचे विश्वासू

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रसाद, तथा जे. पी. नड्डा यांच्याकडे राज्यसभेतील नेतेपदाची धुरा सोपविणे, हे पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. पंतप्रधानांनंतर महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या पदावर आल्यानंतर अर्थातच नड्डा यांच्यावर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठी जबाबदारी राहणार आहे. जवळपास चार दशके राजकारणात असलेले नड्डा यांच्याकडे संघटना आणि संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. मूळ हिमाचल प्रदेशचे असलेले नड्डा यांचा जन्म पाटण्यातला. तेथेच त्यांनी कला शाखेतील पदवी घेतली आणि नंतर हिमाचल प्रदेशात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदशेतच लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या विविध आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले. संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी अनेक वर्षे काम केले.

सन १९८९मध्ये ते परिषदेचे ‘राष्ट्रीय महामंत्री’ झाले आणि पुढील दोन वर्षांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. याच काळात हिमाचल प्रदेशातील विलासपूर मतदारसंघातून ते विधानसभेत पोहोचले. प्रारंभी विरोधी पक्षनेता आणि पुढील निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अशी त्यांची वाटचाल झाली. हिमाचलमधील राजकारण करीत असताना सन २०१०मध्ये त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले. दोन वर्षांतच राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. याच काळात त्यांचा संघटनेतील अनुभव लक्षात घेऊन पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. सन २०२०मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास संपादन केलेले नड्डा हे सदैव त्यांच्या छायेतच राहिलेले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘पूर्वी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती, आता भाजप सक्षम बनला आहे,’ या त्यांच्या विधानामुळे अनेक चर्चा-वाद झडले. त्या पार्श्वभूमीवर प्रथम मंत्रिमंडळात समावेश आणि आता राज्यसभेतील नेतेपद देऊन मोदी-शहा यांनी एका अर्थाने या ‘सक्षम भाजप’वाल्या नेत्याला बढतीच दिली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-26T19:10:22Z dg43tfdfdgfd