भारतीयांची जिनोम कुंडली!

- बिपीन देशमाने

आपले शरीर असंख्य पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक पेशीत केंद्रक असतो. केंद्रकात ४६ गुणसूत्रे असतात. प्रत्येक गुणसूत्र (Chromosome) एका प्रचंड मोठ्या डीएनएच्या धाग्याने बनलेले असते. डीएनए (DNA) म्हणजे दुहेरी गोफ. या गोफातील प्रत्येक साखळी शर्करा आणि फॉस्फेटच्या रेणूंना जोडून बांधलेली असते. अशा दोन साखळ्या म्हणजे शिडीच्या दोन बाजू आणि त्यांना जोडणाऱ्या पायऱ्या म्हणजे नायट्रोजनयुक्त घटक. ते चार प्रकारचे असतात. अॅडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसीन. थोडक्यात ए, टी, जी, सी अशी चारच मुळाक्षरे असंख्यवेळा वापरून आपला जीवनग्रंथ लिहिलेला असतो. माणसात तीन अब्जांपेक्षा जास्त मुळाक्षरे असतात. प्रत्येक पेशीत या चार मुळाक्षरांची डीएनएवरील क्रमवारी ही एकमेवाद्वितीय असते. ही क्रमवारी शोधून काढणे म्हणजे डीएनए सिक्वेन्सिंग(DNA sequencing). प्रत्येक सजीवाच्या प्रजातीच्या मुळाक्षरांची संख्या आणि क्रमवारी वेगवेगळी. पेशीत असणारा संपूर्ण डीएनए म्हणजे जिनोम (gnome). डीएनएच्या धाग्यावरील ए, टी, जी, सी या चार मुळाक्षरांची क्रमवारी म्हणजे जिनोम कुंडली! यातच आपल्या संपूर्ण आयुष्याचा आराखडा, नकाशा दडलेला असतो.

भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या नेतृत्वाखाली नुकताच १० हजार भारतीयांचा हा मुळाक्षरांचा अनुक्रम शोधून काढण्यात आला आणि त्याचा संदर्भकोश बनवण्यात आला. भारताची लोकसंख्या १४० कोटी (India Population) आहे. त्यामानाने १० हजार हा आकडा फारच कमी आहे. परंतु, सुरुवात छान झाली आहे. भारतात साडेचार हजार विविध वांशिक लोकसंख्या गट आढळतात. त्यातील अधिकाधिक लोकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांचा जिनोम अभ्यासण्यात आला आहे. ही एक प्रकारची डीएनए बायोबँकच म्हणता येईल.

यातून आपल्या हाती काय लागेल? भारतातील अनुवंशिक विविधतेचा अभ्यास आपल्याला करता येईल... जिनोममधील मुळाक्षरांचा कोणता अनुक्रम बऱ्याच लोकांत आढळतो, कोणता दुर्मिळ-अतिदुर्मिळ आहे, कोणती उत्परिवर्तने आहेत, त्याचा उद्भवणाऱ्या विकारांशी काय संबंध आहे, हे अभ्यासता येईल. त्याचे निदान करता येईल आणि त्यानुसार वैयक्तिक औषधोपचार पद्धती ठरवता येईल...

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T08:06:27Z dg43tfdfdgfd