बीडमध्ये भाजपसमोर आव्हान

छत्रपती संभाजीनगर – भाजपचा बालेकिल्ला असा इतिहास राखून राहिलेल्या बीड जिल्ह्याचा गड दिवसेंदिवस ढासळत असून, पक्षापुढे नवनवी आव्हाने उभी राहात आहेत. गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माघार घेत असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. तर केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे या पुन्हा कार्यक्षेत्रात सक्रिय झाल्या आहेत.

गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी तब्येत आणि पालकमंत्री धनंजय मुंडेंवर जाहीर नाराजी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे माध्यमांना सांगून टाकले आहे. मागील चार महिन्यांपासून आपण फोनपासूनही दूर असून, कोणाचे फोनही स्वीकारणे बंद केले आहे. त्यामागे तब्येतीचे कारण असून, अगदीच तातडीचे काम असेल तरच आपण मुंबईत जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपण किंवा आपल्या घरातील कोणी सदस्यही निवडणूक लढवणार नसल्याचे सूतोवाचही आमदार पवार यांनी केले. माध्यमांसमोर वरील माहिती सांगताना आमदार पवार यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही रोष व्यक्त केला. आपल्या मतदार संघात विकासात्मक कामे झपाट्याने करण्यासाठी काही चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असून त्यासंदर्भाने पालकमंत्र्यांकडे मागणी केली असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही पवार यांनी केला.

हेही वाचा >>> जलपूजनातून प्रचाराचा धडाका

गेवराईत आमदार लक्ष्मण पवार आणि अमरसिंह पंडित हे परस्परांचे साले-मेहुणे नात्यांमध्ये असून दोन्ही घराण्यातील राजकीय संघर्षाभोवती स्थानिक राजकारण फिरते. आमदार पवार हे दहा वर्षांपासून भाजपचे आमदार असून, अमरसिंह पंडित यांचा त्यांनी यापूर्वी पराभव केलेला आहे. धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्या मैत्रीवर जिल्ह्यात कायम जाहीर चर्चा सुरू असते. यातूनच आमदार पवार यांची कोंडी करून माघार घ्यायला त्यांना भाग पाडल्याचे मानले जात आहे. आमदार पवार यांनी पंकजा मुंडे यांना राजकीय परिस्थितीची जाणीव करून देऊनही काहीच परिणाम झाला नसल्याचेही सांगितले. आमदार पवार यांचे मतदार संघातील राजकीय विरोधक मात्र, लोकांच्या संकट काळात स्वत:ची दारे बंद करून ठेवल्यामुळे त्यांना आता पराभवाची भीती वाटू लागली असून, त्यातूनच त्यांनी माघार घेतल्याचा आरोप करत आहेत. केजच्या भाजपच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे या पुन्हा मतदार संघात सक्रिय झाल्या आहेत. आपण पक्षाने सांगितल्यानुसार २०१९ च्या विधानसभेच्यावेळी माघार घेतली होती. आता आपण सक्रिय झालो आहोत, असे सांगत प्रा. ठोंबरे या मतदार संघात विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. मध्यंतरी त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली. प्रा. ठोंबरे या सक्रिय झाल्यानंतर महिनाभरापूर्वी त्यांच्या वाहनावर दगडफेकही झाल्याने त्या अधिकच चर्चेत आल्या. त्यांच्या सक्रियतेने केजच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांची आणि भाजपचीही डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा >>> शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना सरकारी पदे; भाजप, अजित पवार गटाचे नेते दुर्लक्षित

गेवराई-आष्टीतील जागांमध्ये आदलाबदल ? आमदार लक्ष्मण पवार यांनी माघार घेतल्याने महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) गेवराई व आष्टीतील जागांवर अदला-बदल होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आष्टीसाठी भाजप आमदार सुरेश धस हे तर गेवराईत राष्ट्रवादीकडून माजी आमदार अमरसिंह पंडित हे जोर लावून आहेत. तसे झाले तर आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागू शकते, अशी चर्चा आहे.

2024-09-19T12:04:56Z dg43tfdfdgfd