पुनश्च परीक्षा

माझ्या अनेकविध आठवणी परीक्षांच्या अनुभवांशी जोडलेल्या आहेत. काही विद्यार्थी म्हणून, काही शिक्षक म्हणून, काही वर्गातील सुपरवायझर म्हणून, तर काही प्रशासक म्हणून. एक गमतीशीर आठवण आहे. अगदी सुरुवातीच्या काळात पहिल्या दुसऱ्या परीक्षेच्या वेळेस एक छान लिहिलेला बऱ्यापैकी हस्ताक्षर असलेला पेपर हातात आला. पेपर मानसशास्त्राचा होता. पहिलाच प्रश्न होता, डिफाइन सायकॉलॉजी अँड डिस्कस व्हेरियस फिल्ड्स ऑफ सायकॉलॉजी. आणि मग पुढचे उर्वरित दहा प्रश्न होते, पेपर पहिल्यांदा चाळून बघताना अक्षर ठीक, प्रश्नांची म्हणजे उत्तरांची सुरुवात व्यवस्थित केलेली म्हणजेच, सायकॉलॉजी इज डिफाइन्ड... पण त्याच्यापुढे मात्र तत्कालीन, ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातली गाणी इंग्रजी लिपीत लिहिलेली होती. आता या विद्यार्थ्यावर ‘हसावं का रडावं’ मला काही कळेना. तो बिचारा एवढी लांबलचक उत्तर लिहूनही, त्या पेपरमध्ये शून्य मार्क घेऊन नापास झाला.

एकदा एक पेपर तपासताना आलेला अनुभव. विद्यार्थी व्यवस्थित पास झालेला होता, पण पेपरच्या शेवटी पेन्सिलीने काही लिहिलेले होते. मला वाटले काही रफ् मुद्दे असतील, पण ते एक विनंती पत्र होते की, ‘तो कसा घरातला एकटा कमवता आहे, त्याला वडील नाहीत, लहान बहिणींची शिक्षण करायची आहेत वगैरे...म्हणून तुम्ही कृपया मला पास करा’ असे त्याने लिहिलेले. तो आधीच पास झालेला असल्याने मला काही कुठल्या नैतिक पेचाला सामोरे जावे लागले नाही. परंतु, अर्थातच प्राचार्यांनी त्याला बोलवून समजही दिली आणि मदतही केली. जवळजवळ २५ वर्षांपूर्वीची एक आठवण अतिशय प्रतिकात्मक आहे. एक छान चुणचुणीत विद्यार्थिनी (कल्पना) उत्साहाने भरलेली दुसऱ्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेली आणि लग्न होऊन परत आली. गावाकडे शेतीची काम म्हणून तिला काही वर्षभर येणे शक्य नव्हते. तिने सासरच्या मंडळींना, नवऱ्याला कसेतरी पटवून, ‘मला टीवायची परीक्षा तरी देऊ द्या,’ असे सांगितले. परीक्षेसाठी ती जेव्हा आली, तेव्हा तिचे नऊ महिने भरत आलेले होते. ही चुणचुणीत, आधीची उत्साही कल्पना, आता काहीशी गंभीर आणि अर्थातच ओझ्याने जड झालेली होती. पण तिचे पेपर देण्याची, परीक्षा लिहिण्याची जिद्द मात्र वाखाणण्यासारखी होती. विद्यापीठाचे सहा पेपर्स काही अंतराने असलेले आम्ही सर्वच हितचिंतक-शिक्षक आणि विशेष करून शिक्षिका फारच काळजीत होतो. कल्पना, प्रत्येक पेपराला येत होती. जसजशी ती एकेक परीक्षा पुढे सरकत होती, तसतसा आम्ही हळूहळू सुटकेचा निश्वास टाकत होतो. पठ्ठीने सहावा पेपर दिला आणि तिथूनच हॉस्पिटलला भरती झाली आणि तिला त्याच दिवशी कन्यारत्न झाले. काही महिन्यांनी ती निकालासाठी आली. आवर्जून बर्फी घेऊन आली आणि एक वाक्य मात्र म्हणाली की, ‘मला ज्या प्रकारे शिक्षण पूर्ण करावे लागले तसे माझ्या मुलीला करावे लागणार नाही. मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन आणि तिला हवे तेवढे शिकू देईन.’ मनात म्हटलं, ‘हीच शिक्षणाची फलश्रुती.’ वेळ लागतो पण चांगले विचार कधी ना कधी झिरपत राहतात. कुठे ना कुठे त्याची फळं आपल्याला पाहायला, चाखायला मिळतात.

एक नेहमीचा प्रश्न मग कल्पनाच्या बाबतीत उपस्थित झाला होता, तो म्हणजे हजेरीचा नियम लावायचा की नाही, परीक्षा देऊ द्यायची की नाही. मला असे वाटते की, नियम हे काटेकोरपणे पाळण्यासाठी असतात, पण सगळ्याच गोष्टी किंवा मानवी जीवनातले सगळेच पेच, आपल्याला केवळ नियमांच्या कसोटीवर सोडवता येत नाहीत. अशा कितीतरी गोष्टी अनुभवल्या. ज्या मानवतेचा, विद्यार्थी कल्याणाचा, विचार करता नियम थोडा बाजूला सरकवावा लागतो. तसाच निर्णय त्यावेळच्या महाविद्यालय प्रशासनाने घेतला व कल्पना पदवीधर होऊ शकली. आताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिकत असलेल्या सर्व कामांचे क्रेडिट्स, तुमच्या गुणपत्रिकेत प्रतिबिंबित होऊ शकतात. परंतु कल्पनाला तिच्या शेतातल्या कामांचे गुण किंवा क्रेडिटस् मिळण्याची तेव्हा काही अशी सुविधा नव्हती. अशा प्रकारच्या कामांचे क्रेडिट्स मिळणे म्हणजे या सगळ्यावरचे एक महत्त्वाचे उत्तर आहे. ते परिपूर्ण आहे का? हा प्रश्न तरी सुद्धा राहतोच. तर असो!

परीक्षा कशाही घ्या, कुठल्याही पद्धतीने घ्या, पण त्यातला एक थोडासा कडवट अनुभव उरतोच आणि तो म्हणजे विद्यार्थ्यांची ‘कॉपी करण्याची प्रवृत्ती’. मला आठवतंय, ‘मुन्नाभाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, या चित्रपटात कॉपी-केसचा प्रकार दाखवल्यानंतर, ब्लू-टूथ किंवा तशी टेक्नॉलॉजी विकसित होण्याच्या आधी हा प्रयोग अनेक महाविद्यालयातून त्यावेळेस अनेकदा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केला होता. अर्थात अशा विद्यार्थ्यांना त्याची भरभक्कम किंमत मोजावी लागली होती. कधी गंमत म्हणून, कधी अपरिपक्वतेतून, कधी काही गरज होती तर कधी काही मानवी मनाच्या अनाकलनीयतेमधून, कसेही सांगितले, कसेही समजावले, तरी काही विद्यार्थी कॉपी करतच राहतात. परीक्षेची भीती व लिखाणाशी थोडसे शत्रुत्व असलेल्या विद्यार्थ्यांचा यात अधिक सहभाग दिसतो. १९९०-९५ सालानंतर आपल्या देशामध्ये, शिक्षणाच्या, अध्ययनाच्या, ध्यानाच्या अक्षमतेबद्दल काही विचार सुरू झाला. तो औपचारिक प्रणालीमध्ये १९९०-९५ च्या सुमारास आला. विद्यार्थ्यांना पेपर लिहायला अधिक वेळ मिळू लागला, रायटर्स उपलब्ध होऊ लागले. पण त्याआधी मात्र सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्यपणे तीन तासांच्या, दोन तासांच्या मोठाल्या लेखी-परीक्षांनाच सामोरे जावे लागत होते आणि मग त्या भीतीपोटी, कधी कधी वर्गात खूप अॅक्टिव्ह असलेली, खूप छान घरातून आलेली, छान संस्कारी मुलेसुद्धा कॉपीकडे खेचली गेलेली दिसली, पण अध्ययन अक्षमतेचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आता कित्येक महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला जात आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षेची भीती निश्चितच कमी झालेली दिसते. त्यातूनही आमिर खानच्या ‘तारे जमींन पर’सारख्या सिनेमाने या सगळ्याविषयी खूपच जागरूकता निर्माण केली आहे, पण या गटातले पूर्वीचे विद्यार्थी सोडले तरी सुद्धा, कितीतरी वेळा हुशार, चांगले विद्यार्थी आजही अनाकलनीयपणे कॉपी करायला प्रवृत्त झालेले दिसतात आणि म्हणावे लागते,

‘जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति-

र्जानामि पापं न च मे निवृत्तिः । केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ॥ ५७॥ - दुर्योधन उवाच । (महाभारत)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-04T11:17:40Z dg43tfdfdgfd