पनामा कालव्याला कोरड

जागतिक व्यापारात महत्त्वाचे स्थान असलेल्या पनामा कालव्यातील वाहतूक मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. मागील मोसमात पनामामध्ये कमी पाऊस झाल्याने या कालव्यातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत, मात्र या कमी पावसामागे हवामानबदल नव्हे, तर एल- निनो हवामान घटक हे महत्त्वाचे कारण असल्याचे निष्कर्ष ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन’ या गटातील शास्त्रज्ञांच्या पथकाने काढले आहेत.

पनामा परिसरात मागील वर्ष हे कमालीचे कोरडे गेले. मे ते डिसेंबर या पावसाळ्याच्या आठ महिन्यांपैकी सात महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. परिणामी पनामा कालव्याला पाणीपुरवठा करणारा प्रमुख स्रोत असलेल्या लेक गतून या तलावाची पाणीपातळी खालावली. (याच तलावातून निम्म्या पनामा देशाला पाणीपुरवठा होतो.) या पार्श्वभूमीवर, पनामा कॅनाल ऑथॉरिटीने मागील जूनपासून या कालव्यातून प्रवास करणाऱ्या जहाजांची संख्या आणि आकार यांवर निर्बंध घातले. त्यामुळे पनामा कालव्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कित्येक महिन्यांनंतर ती हळू हळू पूर्वपदावर येऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही महिने लागतील, असा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर, मध्य अमेरिकेच्या भागातील कमी पर्जन्यमान हे हवामानबदलाचा परिणाम आहे का, याचा अभ्यास शास्त्रज्ञांच्या या गटाकडून सुरू होता. त्यासाठी ६५ हवामान केंद्रांवरील मागील १४० वर्षांच्या पर्जन्यमानाचे विश्लेषण करण्यात आले. २०२३मध्ये पनामामधील कमी पावसामागे मानवी हस्तक्षेपाच्या परिणामी उद्भवलेला हवामानबदल हे प्रमुख कारण नाही, एल-निनोच्या प्रभावामुळे त्यावर्षी पावसाची आठ टक्के तूट नोंदवली गेली, असे या पथकाने विश्लेषणांती स्पष्ट केले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-08T06:31:08Z dg43tfdfdgfd