निष्प्रभ बायडेन, आक्रमक ट्रम्प

अमेरिकेत येत्या पाच नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. सध्याचे अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन ८१ वर्षांचे आहेत. ते सर्वांत वयोवृद्ध अमेरिकी अध्यक्ष आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती ढासळल्याचे अनेक प्रसंग मागील काही दिवसांपासून ‘व्हायरल’ होत आहेत. ते पाहून बायडेन पुन्हा निवडून आल्यास देशाचा कारभार कसा चालवणार, या चिंतेत अमेरिकेतील मतदार आहेत. गुरुवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी झालेली पहिली वादचर्चा दूरचित्रवाणीवर पाहून मतदारांची चिंता अनाठायी नाही, हे स्पष्ट झाले.

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या उमेदवारांना निवडणुकीपूर्वी वादचर्चेत सहभागी व्हावे लागते. पहिल्या फेरीत बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरचित्रवाणीवर विविध मुद्द्यांवर पक्षांची ध्येयधोरणे मांडण्याची संधी मिळाली. मात्र, नव्वद मिनिटांच्या या चर्चेत बायडेन यांना एकही मुद्दा धडपणे मांडता आला नाही. सरकारच्या धोरणाबाबत तर त्यांना स्पष्ट बोलताही येत नव्हते. आपण काय बोलतो आहोत, कोणत्या मुद्द्यावर आपल्याला मत मांडायचे आहे, हे त्यांच्या लक्षात राहत नव्हते. काही वेळा तर बायडेन ‘ट्रिलियन’ की ‘बिलियन’ या गोंधळात पडले होते. त्यांच्या बोलण्यात विसंगती होत्या. काही वेळा तर ते नुसतेच पुटपुटत होते. एका क्षणी तर बायडेन काय बोलतात, ते मला कळत नाही, म्हणून ट्रम्प उखडलेही.

अमेरिकेत अशा चर्चेच्या निमित्ताने ध्येयधोरणे, सरकारच्या कार्यकाळातील कामकाज थेट मतदारांसमोर मांडण्याची आयती संधी मिळालेली असते. बायडेन यांना मात्र करपद्धती, स्थलांतर, आरोग्य अशा महत्त्वाच्या विषयांवर धड बोलताही आले नाही. आपण करच लावले नाहीत, महागाई वाढलेली नाही, असे सांगितल्याने तर लाखो मतदारांचा विनाकारण रोष वाढवला. इतकेच नाही तर स्वत:चे हसूही करून घेतले. कोणताच ठोस मुद्दा न मांडणारे बायडेन यांनी ट्रम्प यांना चक्क भटक्या मांजराची उपमा दिली. त्यांची ही भाषा अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाच्या अध्यक्षाला शोभेल अशी नव्हती.

वास्तविक जे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर चर्चेसाठी उभे होते, ते बायडेन यांच्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी लहान आहेत. त्यांच्या वादग्रस्त आणि आक्रमक धोरणामुळे अमेरिकेतील जनतेने त्यांना मागील निवडणुकीत नाकारले होते, हा इतिहासच बहुधा बायडेन विसरले. त्यामुळे या चर्चेत मतदारांवर प्रभाव पाडण्याची मिळालेली संधी त्यांनी गमावली. याउलट ट्रम्प यांनी आपले मुद्दे आक्रमकपणे मांडले. अगदी काही वादग्रस्त मुद्देही मोठ्या खुबीने रेटून नेले.

काही मुद्दे तर ट्रम्प यांनी असे परतवून लावले, की बायडेन नि:शब्द झाले. विशेषत: गर्भपात आणि स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी अतिआक्रमक पद्धतीने मुद्दे मांडल्याने बायडेन यांची कोंडी झाली. करोना, अफगाणिस्तानातून सैन्य माघार, गाझा या मुद्द्यांबरोबर ट्रम्प यांनी मांडलेली मते बायडेन यांना सपशेल तोंडावर पाडणारी होती. बायडेन यांनी ट्रम्प यांचे पॉर्नस्टारबरोबरचे प्रकरण चर्चेला आणले. जे गैरवाजवी ठरले.

या सगळ्यांचा परिणाम म्हणून वादचर्चेत बायडेन यांचा सपशेल पराभव झाला. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षात भूकंप झाला आहे. काही पक्षनेते आपण उमेदवार बदलायला हवा, अशी मागणी करू लागले आहेत. अमेरिकन निवडणुकीत सर्वांत जास्त प्रभाव टाकणारे पक्षाचे देणगीदार तर या मुद्द्यावर अडून बसणार, हे त्याच दिवशी स्पष्ट झाले. तातडीने बैठक बोलवली गेली. बायडेन यांचे हितचिंतक आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि बिल क्लिंटन यांनी, बायडेन साफ चुकल्याचे मान्य करून पाठिंब्याची भूमिका घेत सारवासारव केली. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही, सुरुवात थोडी ‘धीमी’ झाल्याचे सांगून बायडेन यांच्यावर विश्वास असल्याचे म्हटले आहे. यानंतर पक्षांतर्गत खळबळ थोपवता आलेली नाही. पक्षनेते काहीही म्हणोत, पक्षाचे हितचिंतक आपली भीती उघडपणे बोलून दाखवत आहेत.

ओबामा यांचे माजी प्रचार व्यवस्थापक डेव्हिड प्लॉफ यांनी तर दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत, हा ‘डेफकॉन वन मोमेंट’ (सैन्याला कोणत्याही क्षणी आक्रमणासाठी तयार होण्याचा इशारा) असल्याचे सांगून धोक्याची जाणीव करून दिली आहे. ‘बायडेन आणि ट्रम्प यांच्या वयात तीन वर्षांचे अंतर आहे. पण या चर्चेत हे अंतर सुमारे ३० वर्षांचे आहे, हे दिसत होते. हीच बाब मतदारांना खऱ्या अर्थाने प्रभावित करणारी आहे,’ असे सांगून त्यांनी बायडेन यांचे ‘वाढलेले वय’ पक्षाचे किती जास्त नुकसान करू शकते, याचा अंदाज दिला आहे.

बायडेन-ट्रम्प यांच्यातील या चर्चेनंतर अमेरिकेतील चौथ्या स्तंभाने तर बायडेन यांनी आता स्वत:हूनच अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी, असे सुनावले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच बायडेन यांचे वय वादात होतेच; वादचर्चेने ते आणखीच वादग्रस्त झाले आहे. पक्षाने सध्या तरी त्यांच्याऐवजी अन्य नावाचा विचार केलेला नाही. ऐन वेळी बायडेन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यायला लावणे, हे पक्षासमोरील मोठे आव्हान असेल. सध्या अशी भूमिका घेणे हे अमेरिकेतील अत्यंत किचकट प्रशासकीय नियम, गुंतागुंतीच्या अटी आणि न्यायालयीन खटले यात अडकण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास ८१ वर्षांचे बायडेन, की त्यांच्यापेक्षा तीन वर्षे लहान असलेले ट्रम्प यांपैकी एकाची निवड करून ‘लोकशाही वाचवण्याचे काम’ अमेरिकेतील सुज्ञ मतदारांना करावे लागणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T10:06:51Z dg43tfdfdgfd