नांदेडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : नीट परीक्षेत कमी गुण मिळणार व कुणबी मराठा आरक्षण नसल्यामुळे संधी मिळणार नाही, या निराशेतून लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ येथील एका इयत्ता १२वीतील विद्यार्थ्याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रोजी सकाळी उघडकीस आली. प्रमोद जानकीराम भुजबळ (वय १९) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी प्रमोदने चिठ्ठी लिहिली होती.

प्रमोद हा ६ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वडलांचा जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेला व तेथेच जेवन करून काका, आजोबा व भावासोबत झोपला. दरम्यान, दुस-या दिवशी मंगळवारी सकाळी आजोबा लक्ष्मण भुजबळ हे लवकर उठून घरी जात असताना प्रमोदला घरी चल, असे म्हणाले असता त्याने आखाडयावर कोणी नाही. मी नंतर येतो असे सांगितले. त्यामुळे मोतीराम व प्रदीप सकाळी साडे सहा वाजता घरी निघून आले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास प्रमोद हा घरी का आला नाही, ते पाहण्यासाठी त्याचा मोठा भाऊ प्रदीप हा शेताकडे गेला. तेव्हा लिंबाच्या झाडाला प्रमोद नायलोनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या प्रकरणी लोहा पोलीस या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा-उदयनराजेंविरुध्द शशिकांत शिंदे  प्रतिष्ठेच्या लढतीचा कौल सीलबंद; कमळ की तुतारी आतापासूनच उत्सुकता

नीटची अन्सरकी पाहिल्यापासून अस्वस्थ

दरम्यान प्रमोदने ५ मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. त्या परिक्षेची अन्सरकी पाहिल्यापासून तो अस्वस्थ राहू लागला. त्याला तू असा का वागतोस, असे काका सूर्यकांत यांनी विचारल्यावर माझा पेपर अवघड गेला असे म्हणत होता. त्यामुळेच पुतन्या प्रमोद हा शेतात लिंबाच्या झाडाला सकाळी साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान, गळफास घेवुन मरण पावला आहे. त्याच्या मरणाबाबत माझी किंवा माझया नातेवाईकांचा संशय किंवा तक्रार नाही, असे धानोरा भुजबळ येथील मृत प्रमोदचे काका सूर्यकांत लक्ष्मण भुजबळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

काय म्हटले चिठ्ठीत…

मी प्रमोद जानकीराम भुजबळ आज रोजी मराठा समाजाला कुणबी आरक्षण नसल्यामुळे मी नीटची परिक्षा देऊन सुध्दा माझा निकाल कमी येऊ शकतो. मी आरक्षणामुळे पात्र ठरू शकत नाही. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.

2024-05-07T16:52:50Z dg43tfdfdgfd