जी. निर्मला… हौंसलों की उडान

सुचित्रा प्रभुणेएखादी गोष्ट जर तुम्हाला मनापासून हवी असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत, तर ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी ब्रम्हांडदेखील मदत करते, अशा प्रकारचा संवाद आपण अनेकदा चित्रपटातून ऐकलेला असतो. पण हा खरोखरीच प्रत्यक्षात येतो का? याबदल मात्र आपण साशंक असतो आणि ज्या लोकांच्या बाबतीत हा अंदाज खरा ठरतो, त्यांना आपण भाग्यवान समजतो. अशाच भाग्यवान मंडळीपैकी एक म्हणजे जी. निर्मला.

आंध्र प्रदेशमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV), कुरनूल इथे शिकणारी आणि इंटरमीडिएट बोर्डाच्या परीक्षेत ४४० पैकी ४२१ गुण प्राप्त केल्याने जी. निर्मला प्रकाशझोतात आली. अर्थात हा प्रवास वाटतो तितका सहज नव्हता. बालविवाहापासून सुटका करून तिने स्वत:च्या जिद्दीवर हे यश मिळविलं ही कौतुकास्पद बाब आहे.

हेही वाचा… भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण

आंध्रप्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील पेडा हरीवनम या एका छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. तिला तीन मोठ्या बहिणी आणि घरची आर्थिक परिस्थती बेताचीच. निर्मलाला शिक्षणामध्ये प्रचंड रस; परंतु मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्न उरकून टाकण्यावर कुटुंबीयांचा अधिक भर होता.

तिच्या तीनही बहिणींची लग्नं झाल्यानंतर घरात निर्मलाच्या लग्नाचे वारे वाहू लागले. निर्मलाला आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि तिचं वयदेखील लग्नायोग्य नव्हतं. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे निर्मलाला तिचं शिक्षण देखील अर्धवट सोडावं लागलं.

तिच्या घराजवळ असलेल्या एका महाविद्यालयात तेथल्या स्थानिक आमदार आमदाराने मुलींसाठी एका शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन केलं होतं. याविषयी समजताच निर्मलानं तिथे जाऊन थेट त्या आमदारांची घेतली आणि आपली अडचण सांगितली. तसेच घरचे आपला बालविवाह करण्यास कसे उत्सुक आहे, हे देखील सांगितलं. तिची सारी कहाणी ऐकल्यानंतर आणि तिचा शिक्षणामधला रस पाहून त्यांनी तिला मदत करायचं ठरविलं.

त्यांनी तिची कहाणी तेथील जिल्हा अधिकारी जी. सृजना यांच्या कानावर घातली. सृजना यांनी तिला सर्वतोपरी मदत करायचं ठरविलं. त्यांनी पुढाकार घेऊन कायद्याचा बडगा दाखवून, प्रथम तिची बालविवाहापासून सुटका केली. तिच्या गावापासून जवळ असलेल्या अस्पारी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तिचं नाव दाखल करवून घेतलं. ही शाळा सरकारी असून, परिस्थितीपायी ज्या मुलींना शिक्षण घेता येत नाही, परंतु शिकण्याची खूप इच्छा असते अशा मुलींना तिथल्या सरकारतर्फे शिकण्याची संधी दिली जाते.

हेही वाचा… गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?

बालविवाहापासून सुटका आणि पुन्हा एकदा शिक्षणाची संधी मिळाल्यावर, निर्मलानं या संधीचं सोनं करायचे ठरविलं. ती नव्या जोमानं अभ्यासाला लागली. याचा परिणाम असा झाला की, तिला दहावीच्या परीक्षेत ४४०पैकी ४२१ गुण मिळवून ती पहिली आली.

आपल्या या यशाचा तिला तर आनंद झालाच, पण तिला मदत केलेले आमदार आणि जिल्हाधिकारी जी. सृजना यांना देखील प्रचंड आनंद झाला. इतकेच नाही तर तिची ही कहाणी पार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचली. स्वत:च्याच बालविवाहाविरोधात उभ्या रहाणाऱ्या निर्मलाचं त्यांनी कौतुक तर केलेच आणि पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासनही दिलं.

निर्मलाला पुढे उच्च शिक्षण घेऊन आयपीएस अधिकारी व्हायचं आहे आणि आयपीएस अधिकारी होऊन परिस्थितीपायी ज्या ज्या मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, त्या त्या सर्व मुलींना मदत करण्याचं तिचं ध्येय आहे. इतकंच नाही तर मुलींच्या बाबतीत बालविवाहासारख्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत, त्यांचं समूळ उच्चाटन व्हावं असेदेखील तिला वाटतं. ‘‘माझ्या प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर मी माझं शिकण्याचं स्वप्न पूर्ण करू शकले, पण अशा अनेक मुली आहेत, ज्यांना ही वाट सापडत नाही, आणि अशा मुलींना निश्चितपणे वाट दाखविण्यासाठी मी भविष्यात कार्यरत राहणार आहे.’’ असं ती ठामपणे सांगते.

परिस्थितीपायी साधं शिक्षण घेणंदेखील दुरापास्त असताना, स्वत:च्या प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर, घरच्याच मंडळींशी संघर्ष करून आपल्या स्वप्नांना वाट मोकळी करून देणाऱ्या जी. निर्मलाच्या कर्तृत्त्वाला खरोखरीच सलाम.

2024-04-19T08:03:20Z dg43tfdfdgfd