‘अभिजात’ निद्रेतून जाग

प्रचार शिगेला पोहोचला आहे. खरे बाण परवडले असे घायाळ करणारे वाग्बाण गेंड्याच्या कातडीचे नेते परस्परांवर सोडत आहेत. मात्र, या गदारोळात कुणालाही केंद्र सरकारच्या दरबारात अनेक वर्षे धूळ खात पडून असलेल्या ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,’ या मागणीचे सोयरसुतक नाही. अशा या संस्कृतिशून्य चिखलखेळात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याबद्दल त्यांचे आणि काँग्रेसचे करावे तितके अभिनंदन थोडे आहे. हे घोंगडे दहा वर्षे भिजते आहे.

मधल्या काळात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्हा मूळचीच मराठीप्रेमी शिवसेना, महाराष्ट्रापुरताच आवाका असणारा राष्ट्रवादी आणि द्रष्टा काँग्रेस पक्ष यांनी यासाठी काय प्रयत्न केले किंवा केंद्राला कितीवेळा अंतिमोत्तर दिले, हा प्रश्नच आहे. तरी, सध्याच्या रणधुमाळीत हा विषय काढावा, असे काही फेऱ्यांनंतर का होईना, काँग्रेसला वाटले. हेही नसे थोडके! महाराष्ट्र आणि मराठीच्या प्रेमाने ज्यांचे बाहू अहोरात्र फुरफुरत असतात, अशा पक्षांनी काँग्रेसकडून काही शिकावे. गेली दहा वर्षे मोदी सरकारने या मागणीबाबत महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. मराठीप्रमाणे बंगालीचीही ही मागणी केंद्राकडे पडून आहे. मराठी भाषेचा इतिहास हा सरळ दीड हजार वर्षे मागे जातो. तसे अहवाल सादर झाले. तेही प्रदूषित दिल्लीतील धूळ पचवत आहेत. आता केंद्र सरकारने एक हजार वर्षे इतकाच भाषेचा सलग प्रवास पुरे, असे ठरविले आहे. मग तर मराठी सहजच या निकषात बसते. केंद्र सरकारने असाच विलंब लावला तर काही काळाने ‘ज्ञानेश्वरी’लाही एक हजार वर्षे पुरी होतील. (सन १२९० ते २२९०!) मोदी सरकारने महाराष्ट्राबाबत असा अन्याय का चालविला आहे; याचा खडसावून जाब महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभांमध्ये विचारायला हवा होता. मात्र, जयराम रमेश यांनी जाग आणेपर्यंत सारे झोपलेले होते. अजूनही जाग येण्याची खात्री नाहीच.

मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांचे मराठीवर प्रेम असेल तर त्यांनी चार जूननंतर शंभर दिवसांत नव्या सरकारकडून अभिजात दर्जा खेचून आणू, अशी घोषणा करावी. खरीही करावी. प्रचारात वाट्टेल त्या भाषेत गरळ ओकणारे सर्वपक्षीय नेते आपण ज्या भाषेचे धिंडवडे काढतो आहोत; तिचा इतिहास इतका प्राचीन आहे आणि त्यावर मान्यतेची मोहोर उमटायला हवी, इतकीही कृतज्ञता बाळगायला तयार नाहीत. मराठी समाजाची स्थिती तर अशी आहे की, एकाही नेत्याची एकही सभा या औरस मागणीसाठी बंद पाडण्याची ताकद ‘तट्टांना यमुनेचे पाणी पाजणाऱ्यां’च्या अंगात उरलेली नाही!

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-07T06:42:40Z dg43tfdfdgfd