UBT TARGETS DEVENDRA FADNAVIS: “क्लिप्स वगैरे प्रकरणात फडणवीसांना भलताच रस आहे, त्यांनी…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

Devendra Fadnavis on Anil Deshmukh: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. आधी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं. त्यावर पुन्हा अनिल देशमुखांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं असून यावर आता ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करतानाच भाजपाची ही सवयच असल्याची टीका ठाकरे गटानं केली आहे.

देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख

अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक दावा केला. “आदित्य ठाकरेंनी दिशा सलियानवर बलात्कार करून तिला गच्चीवरून ढकलून दिलं, उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकीसाठी आपल्याला पैसे जमवायला सांगितले, याशिवाय अनिल परब व अजित पवार यांच्याविरोधात आरोप करणारे चार प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या माणसाकरवी आपल्यावर टाकला. अन्यथा अटक करण्याची धमकीही दिली”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना उलट देशमुखांनाच आव्हान दिलं. “आमच्याकडे अनिल देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत. त्या बाहेर काढू”, असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलं. या सगळ्या प्रकरणावर सामना अग्रलेखातून फडणवीसांवर व भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

“..हा भाजपाचा अलिकडचा मूळ धंदा”

“फडणवीस यांनी हे जे उपद्व्याप केले, त्याचे ‘पेन ड्राईव्ह’ पुरावे आपल्याकडे आहेत. ते आपण बाहेर काढू’, असे देशमुखांनी जाहीर करताच फडणवीस यांनी ‘आमच्याकडेही देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत, त्या बाहेर काढू. मग बघा!’ असा दम भरला. म्हणजे फडणवीस यांनी भाजपच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवलेच. विरोधकांचे फोन चोरून ऐकणे, फोन रेकॉर्ड करणे, व्हिडीओ क्लिप करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणे व पुढे त्या माध्यमातून आपल्या राजकीय विरोधकांना ब्लॅकमेल करणे हा अलीकडचा मूळ धंदा झालाच आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं टीका केली आहे.

“मुख्यमंत्री ठाकरे व इतर तिघांविरुद्ध आम्ही सांगतो ते आरोप करा, तशा प्रतिज्ञापत्रांवर सही करा. मग आम्ही हे सरकार पाडतो व तुमची अटक टाळतो’, असा हा सौदा होता”, असा दावाही ठाकरे गटानं केला आहे.

रश्मी शुक्ला प्रकरणावरून टीका

“राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी त्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फडणवीस यांच्यासाठी किमान विसेक राजकीय विरोधकांचे फोन ‘चोरून’ ऐकले व या भयंकर गुन्ह्याची चौकशी ठाकरे सरकारच्या काळात सुरू झाली. शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पण भाजपाने आमदारांना विकत घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये करणाऱ्या शुक्ला यांना सरळ राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले. त्यामुळे ‘क्लिप्स’ वगैरे प्रकरणात फडणवीस यांना भलताच रस आहे”, असा टोलाही अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

“देवेंद्र फडणवीसांनी भाजपातील अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स कोणी केल्या व प्रसारित केल्या हे जगाला माहीत आहे. ‘क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे”, असा आरोपही ठाकरे गटानं केला आहे.

2024-07-27T02:58:38Z dg43tfdfdgfd