TIRUPATI BALAJI : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर झाला, चंद्राबाबू नायडूंचा धक्कादायक आरोप

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा केला आहे. व्हायएसआर काँग्रेसच्या मागील सरकारअंतर्गत तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला गेला असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा आरोप फेटाळून लावला असून हा दावा अतिशय दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.

तिरुपती बालाजी हे भारतातील मंदिर जगप्रसिद्ध असून विविध ठिकाणांहून अनेक लोक इथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या मंदिराचं व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे केलं जातं. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. याच लाडूच्या प्रसादाबाबत चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा केला आहे.

बुधवारी एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला नायडू संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी, जगन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता. मागील पाच वर्षांपासून व्हायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमला हे पवित्र देवस्थान कलंकित केलं आहे, अशी टीका केली.

मंदिरात मोफत जेवण दिलं जातं त्या‘अन्नदानम’ची गुणवत्ताही कमी केली आहे. गुणवत्तेशी तडजोड करत त्यांनी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरुन पवित्र तिरुमला लाडूचं पावित्र्यही कमी केलं आहे. मात्र, आता आम्ही शुद्ध तूप वापरत आहोत. आम्ही टीटीडीच्या पावित्र्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं नायडू म्हणाले.

व्हायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वाय.व्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विटरवर चंद्राबाबू यांच्यावर टीका करत लिहिलंय, की 'चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाचं पावित्र्य आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचवली आहे. तिरुमला मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादाबाबद त्यांनी केलेला दावा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी चंद्राबाबू नायडू कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भक्तांचा विश्वास कमी होऊ न देण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह तिरुमला प्रसादाबाबत देवासमोर शपथ घेण्यास तयार आहे. चंद्राबाबू नायडू त्यांच्या कुटुंबासोबतही असेच करायला तयार आहेत का?', असं म्हणत सुब्बा रेड्डी यांनी नायडूंना सुनावलं आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-19T13:57:52Z dg43tfdfdgfd