TIRUPATI BALAJI PRASAD : तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाला होता का? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर!

Tirupati Balaji Prasad : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली. खरं तर तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच त्या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. मात्र, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपानंतर आंध्र प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे. दरम्यान, आता तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याच्या आरोपानंतर आता प्रयोगशाळेच्या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लॅबच्या अहवालात काय आढळलं?

तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळून आल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती लॅबच्या तपासणी अहवालातून समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला होता. आता तेलुगु देसम पक्षाने यासंदर्भातील प्रयोगशाळेच्या अहवाल समोर आणला आहे. या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात असं उघड झालं आहे की, तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी समाविष्ट होती. त्यामध्ये फिश ऑइल आणि जनावरांच्या चरबीचा समावेश होता.

हेही वाचा : Tirupati Balaji Prasad : “तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर..”, चंद्राबाबू नायडूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतर मोठा वाद

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या (Tirupati Balaji ) वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप केला. चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या या आरोपामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.

चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय?

“मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं पावित्र्य घावलंल. ‘अन्नदानम’ अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसंच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे”, असं चंद्राबाबू नायडूंनी म्हटलं आहे

वायएसआर काँग्रेसने काय म्हटलं?

वायएसआर काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडूंवर तिरुमला मंदिराचं पावित्र्य घालवल्याचा आरोप केला. रेड्डी यांनी तेलुगू ऑन एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली. तिरुमला प्रसादाबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा प्रकारचे शब्द हे कुणीही बोलणं गैर आहे”, असंही रेड्डी यांनी म्हटलं.

2024-09-19T16:34:59Z dg43tfdfdgfd