MEXICAN BAT : वटवाघळांची ‘चमकती’ पावले

- सुजाता बाबर

मेक्सिकोमध्ये वास्तव्य करणाऱ्या वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींच्या पायात फोटोल्युमिनेसेंट ब्रिस्टल्स किंवा चमकणारे राठ केस असतात, असा शोध संशोधकांना नुकताच लागला आहे. जैविक उतींमध्ये फोटोल्युमिनसन्स आढळतो म्हणजे काय, तर त्यातील सेंद्रिय संयुगे, प्रथिने किंवा इतर रंगद्रव्ये आणि पदार्थांद्वारे जास्त तरंगलांबीमध्ये प्रकाशकण शोषले जातात आणि उत्सर्जित केले जातात. आपल्याला ते चमकताना दिसते.

तीन वर्षांपूर्वी मेक्सिकोमधील काही शास्त्रज्ञ शहराजवळील वटवाघळे रात्री जिथे झोपतात त्या जागेतून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पकडण्यासाठी जाळी म्हणून बारीक फिलामेंटच्या लांब पट्ट्यांचा वापर केला जात होता. पकडलेल्या सर्व वटवाघळांना ३० किलोमीटरवरील एका ठिकाणी नेऊन सोडण्यात आले. दोन वस्त्यांमधील वटवाघळे एकीकडून दुसरीकडे फिरतात की नाही, हे शोधण्याचा हेतू यामागे होता. त्यासाठी संशोधकांनी वटवाघळांवर अतिनील प्रकाशामध्ये सहज दिसू शकणाऱ्या पावडरची धूळ टाकली. हा प्रयत्न अयशस्वी झाला. परंतु त्यांना दुसरेच नवल दिसले! दिव्याखाली वटवाघळांचे पाय चमकत होते. आणि ते धुळीमुळे नव्हे, तर नैसर्गिकरीत्या चमकत होते.

मुक्त-शेपटी असलेल्या मेक्सिकन वटवाघळांचे पाय आगळेवेगळे आहेत, हे पूर्वीच्या संशोधनातून संशोधकांना समजले होते. मुक्त-शेपटीवाल्या वटवाघळांच्या पायाच्या बोटांच्या बाहेरील कडांना चमच्याच्या आकाराचे ब्रिस्टल्स किंवा राठ केस असतात. त्यांचा रंग मध्यम ते गडद तपकिरी असतो. त्यांच्या या वैशिष्ट्यांमागची कारणे काय हे आजपर्यंत कोणी शोधू शकलेले नाही. मात्र, नवीन शोधामध्ये हे पाय अतिनील प्रकाशाखाली निळ्या-हिरव्या रंगाचे दिसले. संशोधकांनी काही चाचण्या केल्या आणि दोन्ही वस्त्यांमधील इतर २५ वटवाघळांमध्ये त्यांना समान वैशिष्ट्ये आढळली. संग्रहालयातील वटवाघळांच्या बाबतीतही तेच दिसले. केवळ संध्याकाळी किंवा पहाटे किंवा चंद्रप्रकाशात वटवाघळांचे पाय चमकताना दिसू शकतात, अशी शक्यता संशोधकांना वाटत असून वटवाघळांच्या पायातील बारीक हाडे देखील फोटोल्युमिनेसेंट असतात का याचा शोध घेणे सध्या चालू आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-16T08:23:54Z dg43tfdfdgfd