MARATHWADA LIBERATION DAY : ज्वलंत मराठवाडा, अस्वस्थ तरुणाई

नीलेश राऊत

मराठवाडा आणि संघर्ष हे शब्द एकमेकांना जणू पुरकच. एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणू या. संघर्षाचा वारसा मराठवाड्याच्या निर्मितीपासूनच मिळालेला. हैदराबाद संस्थान मुक्त झाले आणि मराठवाडा स्वतंत्र झाला. भारत देशाचा भाग झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत मराठवाडा सातत्याने विविध संघर्षांना, आंदोलनांना, आक्रोशांना, वेदनांना तोंड देत आला. मुक्तिसंग्राम ते आजच्या मराठा आंदोलनाच्या सर्व संघर्षाच्या केंद्रस्थानी मराठवाडा राहिला. त्यात पुढाकार होता आणि आहे तो मराठवाड्यातील तरुणाईचा. मोहिमा, चळवळी, आंदोलनांमध्ये मराठवाड्यात जे घडत गेले त्यात त्या विषयांमधील अग्रणी व्यक्तींचा समावेश नक्की होता. ज्येष्ठांनी, मातब्बरांनी या आंदोलनांचे नेतृत्व नक्की केले असेल परंतु या आंदोलनांना बळ देण्याचं नि या आंदोलनांना अधिक व्यापक करण्याचं काम मराठवाड्यातील तरुणाईनं केलं हे निश्चितच अधोरेखित करावं लागेल.

मुक्तिसंग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांच्या पाठीशी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तरुणाई उभी राहिली. गावा-गावांत आंदोलनं होत राहिली, अनेक तरुण नेते त्याकाळी भूमिगत झाले, अनेकांनी निजामशाहीच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला आणि मराठवाडा आणि एकूण हैद्राबाद संस्थान भारतात सामील झाली पाहिजे यासाठी अहिंसक अथवा हिंसक मार्गाने त्यावेळच्या तरुणाईने या नव्या स्वातंत्र्याला साद घातली.

हेही वाचा >>> विकसित भारताचा रस्ता छत्रपती संभाजीनगरातून

पण मुक्तीनंतर म्हणजे स्वातंत्र्यांनंतर म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर देखील मराठवाड्याच्या वाट्याला उपेक्षाच आली. ‘मराठवाडा आणि अनुशेष’, ‘मराठवाडा आणि दुष्काळ’, मराठवाडा आणि समस्यांची खोल गर्तता हे समीकरणच जणू बनत गेले. याच सगळ्या मुद्यांना वाचा फोडण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थी चळवळीतील नेत्यांच्यामार्फत १९७२ साली झालेल्या आंदोलनात वसमत येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर मराठवाडा विकास आंदोलनाने पेट घेतला. परिणाम स्वरुपी शंकरराव चव्हाण यांचे नेतृत्व मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले. या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व फक्त आणि फक्त मराठवाड्याच्या तरुणाईने केले. परभणी कृषी विद्यापीठापासून सुरू हा आगडोंब अख्ख्या मराठवाड्यात पसरत गेला आणि मराठवाड्यातली तरुणाई मराठवाड्याच्या हक्कांसाठी, अनुषेशासाठी, सिंचनासाठी, विकासनिधीसाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एकत्रित येत गेले. या चळवळीने अनेक नवीन तरूण नेत्यांना जन्म दिला. त्यांनी पुढे राज्य पातळीवर नेतृत्व केले.

मराठवाड्याचे पुढचे आंदोलन म्हणजे नामांतराचे आंदोलन. शरद पवार हे १९७८ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाने वेग घेतला. त्याअगोदर १९७० च्या दशकापासूनच मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करावे, अशी मागणी जोर धरतच होती. ठिकठिकाणी आंदोलनं सुरू होती, परंतु १९७८ साली शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराबाबत आग्रही भूमिका मांडल्यानंतर दुर्दैवाने यात नवा संघर्ष जन्माला आला. आंदोलनाचं रूपांतर त्याकाळामध्ये दलित विरूध्द सवर्ण संघर्षामध्ये झाले. अनेक दलित वस्त्या, संस्था-संघटना यांच्यावरती हल्ले झाले. परंतु या सगळ्या पातळ्यांवरती संघर्ष होत असताना नामांतर झालेच पाहिजे आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळालेच पाहिजे. हे संपूर्ण आंदोलन पुढे नेण्यामध्ये मराठवाड्यातील फक्त दलित नव्हे तर पुरोगामी चळवळीतील मोठी तरूणाई या सगळ्या आंदोलनाचा भाग होती. याच तरूणाईने मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी अग्रस्थानी भूमिका घेतलेली होती. विविध आयुधांच्या मार्गाने ही तरूणाई सातत्याने राज्य शासनाला, व्यवस्थेला आपला हक्क मिळविण्यासाठी आणि बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला नाव देण्यासाठी सातत्याने संघर्ष करत होती. त्या काळच्या दंगलींना, त्या काळच्या हिंचारालादेखील उत्तर देत होती. कलेच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, आणि वेळ पडल्यास रस्त्यावर आंदोलन करत तरुणाई व्यक्त होत होती. कधी लेखणीतून तर कधी रस्त्यावर. त्यांनी विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळविण्यासाठी मोठी कामगिरी बजावली. हे आंदोलन सत्तरीच्या दशकात सुरू झालं… नव्वदीच्या दशकात संपलं… नामविस्तारच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे मराठवाडा विद्यापीठाला मिळाले परंतु तब्बल वीस वर्ष येथील तरूणाई मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याच्या मुद्याला धरून सातत्याने येथील व्यवस्थेशी संघर्ष करत होता, हे कसे विसरता येईल.

हेही वाचा >>> Marathwada Liberation Day : हवामान बदल हेच मराठवाड्यासमोरचे आव्हान

मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाचा मोठा आगडोंब उसळलेला आहे आणि मराठा तरूणाई रस्त्यावर येऊन आरक्षणाची मागणी करत आहे. मनोज जरांगेंच्या निमित्ताने या तरूणाईला हक्काचा चेहरा मिळाला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी आहेत. परंतु या सगळ्या आंदोलनाचा झेंडा पुढे घेवून जात असेल तर ती मराठवाड्यातील तरूणाई. कोपर्डी येथील भगिनीच्या हत्येनंतर महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यातून सर्वात पहिला मराठा क्रांती मोर्चा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला. या सगळ्या मोर्चामध्ये महिला वर्ग असेल किंवा ज्येष्ठ नागरीक असेल किंवा सामान्य नागरिक हा अग्रस्थानी होताच पण मराठवाड्यातील तरूण-तरूणींनी देखील या पहिल्या मोर्चामध्ये मोठा सहभाग नोंदविला. तिथून सुरू झालेला हा संघर्ष आजवर कायम आहे. आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी आंदोलकांना केलेल्या लाठीमाराच्या निमित्ताने सुरू झालेला संघर्ष व त्याची धग अख्ख्या मराठवाड्यात पसरत गेली, नव्हे तर संपूर्ण राज्यात त्याचे मोठे रौद्ररूप धारण केले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजातील तरूणाई व्यापक पातळीवर जोडली गेली आणि आजही ते तरूण-तरूणी वेगवेगळ्या माध्यमांच्या निमित्ताने संघर्ष करत आहेत. त्याच वेळेला दुसरीकडे ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित रहावे म्हणून देखील आंदोलन सुरू झाले. त्यांचेदेखील उपोषण जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे सुरू झाले. मराठवाड्यामध्ये ओबीसी समाजातील तरूण देखील पुढे येत आहे.

या सगळ्या आंदोलनाच्या मधल्या काळात मराठवाड्यातील दुष्काळ परिणामी होणाऱ्या शेकऱ्यांच्या आत्महत्या हा देखील मुद्दा आहे. यातून संघर्ष खरंतर खूप मोठ्या प्रमाणात उभा रहायला हवा होता. पण दुर्देवाने या मुद्याला धरून फार कमी संघर्ष उभा राहिला. स्थानिक पातळीवरती एखाद्या गावामध्ये आत्महत्या झाल्यानंतर त्या गावातील गावकऱ्यांनी, त्या गावातील तरूणांनी व्यवस्थेविरूध्द बंड केले असेल परंतु या मुद्याला घेवून आणि मराठवाड्याच्या विकासाच्या पातळीवर व्यापक स्वरूपात तरूणांच्या सहभागाचे जनआंदोलन उभे राहिले नाही, हेदेखील तितकेच खरे आहे. मराठवाड्यातील आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे सत्तर टक्क्यांहून अधिक जी संख्या तरूणाईची आहे. मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये १८ ते ४० वयोगटातील तरूण हे मोठ्या प्रमाणावरती आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

अनेक आंदोलनात पुढाकार घेणारा तरुण साहित्य, शिक्षण, कला क्षेत्रात काही नवी प्रारुपे विकसित करु पाहतो आहे. नव्या प्रक्रियांना जन्मही मिळू लागलो आहे. नव्वदीच्या दशकात या सगळ्या समस्यांना त्रासून मराठवाड्यातला तरूण पुण्या-मुंबईला जायचे स्वप्न बघत होता. आता तीच तरूणाई बारावीनंतर किंवा पदवी मिळाल्यानंतर परदेशात जावून शिक्षण कसे घेता येईल आणि तिथेच स्थायिक कसे होता येईल, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मोठा उच्चशिक्षित तरूण वर्ग सातत्याने मराठवाड्यातून बाहेर पडत आहे. एका बाजूला गाळात जाणारी तरुणाई आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यावर मात करणारी तरुणाई आहे.

येथे व्यवस्थेविरुद्ध बंड उभा राहते. त्यात तरुणांचा सहभाग असतो. पण एखाद्या प्रदेशातील तरुणाईला सतत संघर्ष करावा लागणे अधिक वेदनादायी नाही का ? प्रश्न अगदी न्याय वाटपाचेही आहेत. येत्या काळात मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न जर निकाली निघाला नाही, किंवा रोजगार-स्वयंरोजगाराचा प्रश्न सुटले नाहीत तर हा पेटलेला वणवा पुढील काळात अधिक रौद्ररूप धारण करेल यात शंका नाही.

दुर्देवाने मराठवाड्यातील तरूणाई जातीच्या नावावर आणि धर्माच्या नावावर प्रचंड दुभंग आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तो पहावयास मिळाला. आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. काही ठिकाणी ही तरूणाई जाती-जातीमध्ये पुन्हा विभागली जाईल. तत्पर नेते त्याचा लाभ निश्चितच घेतील. पण आता काहीजण नवी प्रारुप मांडू पाहत आहेत. नवी मांडमांड सुरू आहे. त्यात चांगूलपण शोधण्याचे काम करावे लागणार आहे. संघर्षासाठी येणारी धग आत नसेल तर नवी सर्जनशील व्यवस्था तरी कशी जन्माला येईल ? (लेखक हे मराठवाड्यातील सामाजिक व राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत.)

2024-09-18T11:04:34Z dg43tfdfdgfd