GODREJ GROUP SPLITS : गोदरेज समूहाचे कुटुंबीयांमध्ये विभाजन

नवी दिल्ली : साबण आणि गृहोपयोगी वस्तूंपासून ते गृहनिर्माण क्षेत्रापर्यंत पसरलेल्या १२७ वर्ष जुन्या गोदरेज समूहाच्या संस्थापक कुटुंबीयांमध्ये विभाजन करण्याचा निर्णयावर गुरुवारी शिकामोर्तब केले. गोदरेज कुटुंबाने मंगळवारीच गोदरेज कंपन्यांमधील त्यांच्या भागभांडवलाच्या मालकीची पुन:संरचना जाहीर केली होती, ज्या अंतर्गत गोदरेज समूहाचे दोन घटकांमध्ये विभाजन झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही गट गोदरेज ही नाममुद्रा वापरणे सुरू ठेवतील.

सर्वसंमत विभाजनानुसार, अदि गोदरेज, त्यांचा भाऊ नादिर आणि संलग्न कुटुंबीयांकडे गोदरेज इंडस्ट्रीज, जिच्या अंतर्गत सूचिबद्ध अन्य पाच कंपन्यांची मालकी आली आहे. तर अदि यांचा चुलत भाऊ जमशीद आणि स्मिता या त्यांच्या भगिणीला असूचिबद्ध गोदरेज अँड बॉयस आणि त्याच्या संलग्न कंपन्यांसह मुंबईतील प्रमुख मालमत्तांसह जमिनीचा हिस्सा आला आहे.

गोदरेज समूह आता दोन शाखांमध्ये विभागला गेला आहे, एका बाजूला अदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशीद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा आहेत.

हेही वाचा >>> संयुक्त म्युच्युअल फंड खात्यांसाठी नामनिर्देशन आता पर्यायी

गोदरेज एंटरप्रायझेस समूहामध्ये गोदरेज ॲण्ड बॉयस आणि त्याच्या संलग्न कंपन्यांचा समावेश आहे. ज्यांचे एरोस्पेस आणि एव्हिएशन ते संरक्षण, फर्निचर आणि आयटी सॉफ्टवेअर अशा अनेक व्यवसायांमध्ये उपस्थिती आहे. त्याच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जमशीद गोदरेज काम बघणार आहेत. तर त्यांची बहीण स्मिता यांची मुलगी नायरिका होळकर या कार्यकारी संचालक असतील. मुंबईतील ३,४०० एकर जमिनीवर यांचेच नियंत्रण असेल.

गोदरेज इंडस्ट्रीज समूह म्हणजेच ज्यामध्ये पाच सूचिबद्ध कंपन्यांचा समावेश आहे. त्यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ॲग्रोव्हेट आणि ॲस्टेक लाइफसायन्स यांचा समावेश असून नादिर गोदरेज हे त्याचे अध्यक्ष असतील. ते आदि, नादिर आणि त्यांच्या कुटुंबांद्वारे नियंत्रित केले जातील.

हेही वाचा >>> सार्वजनिक गुंतवणूक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची चालक: आयएमएफ

आदि गोदरेज यांचा मुलगा पिरोजशा गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी उपाध्यक्ष असतील आणि ऑगस्ट २०२६ मध्ये ते नादिर यांच्यानंतर अध्यक्ष होतील, असे निवेदनात म्हटले आहे. गोदरेज कुटुंबाने या विभाजनाला गोदरेज कंपन्यांमधील भागभांडवलाच्या मालकीची पुन:संरचना असे म्हटले आहे. गोदरेज कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद कायम राखण्यासाठी आणि मालकी अधिक चांगल्या प्रकारे संरेखित करण्यासाठी आदरपूर्वक आणि सजग मार्गाने विभाजन केले गेले, गोदरेज समूहाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आपसात सामंजस्याने केलेले विभाजन पूर्ण करण्यासाठी, दोन्ही बाजूंनी संचालक मंडळावरील आपले अधिकार सोडले आहेत. त्यामुळे, आदि आणि नादिर गोदरेज यांनी गोदरेज ॲण्ड बॉयसच्या संचालक पदाचा राजीनामा दिला, तर जमशीद गोदरेज हे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या संचालक मंडळावरून पायउतार झाले.

मौल्यवान जमीन-मालकी

गोदरेज अँड बॉयस आणि त्याच्या संलग्न कंपन्यांकडे मुंबईतील ३,४०० एकर जमिनीची मालकी आली आहे. त्यात मुंबईतील विक्रोळी येथील ३,००० एकर जमिनीचा समावेश आहे. अंदाजानुसार, विक्रोळी जमिनीची विकास क्षमता १ लाख कोटींहून अधिक चौरस फुटांची आहे. विक्रोळीमधील १,००० एकर जमीन विकसित केली जाऊ शकते तर, सुमारे १,७५० एकर क्षेत्र खारफुटीने व्यापलेले आहे. ते अनेक दुर्मिळ वनस्पती आणि पक्ष्यांचे गंतव्यस्थान आहे. सुमारे ३०० एकर जमिनीवर यापूर्वीच अतिक्रमण झाले आहे. विक्रोळीतील मालमत्ता पिरोजशा यांनी १९४१-४२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसीव्हरकडून सार्वजनिक लिलावात विकत घेतली होती. पूर्वी पारशी व्यापारी फ्रामजी बनाजी यांच्या ती मालकीची होती, जी त्यांनी १८३० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून विकत घेतली होती.

2024-05-01T17:15:03Z dg43tfdfdgfd