UGC'S NEW ANNOUNCEMENT FOR GRADUATE STUDENTS: UGC ची मोठी घोषणा, पदवीधर विद्यार्थी थेट जाऊ शकणार PHDला

UGC's new announcement for graduate students: जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते थेट पीएचडीला प्रवेश घेऊ शकणार आहेत; आणि (UGC NET) यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहेत. यासाठी त्यांना यापुढे पदव्युत्तर शिक्षण (Post Graduate Degree) घेण्याची गरज भासणार नाही. तथापि, पीएचडीच्या प्रवेशासाठी, त्यांना चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात किमान ७५% गुण मिळवणे अनिवार्य आहे.

• ही सुविधा कधी लागू होणार?

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC: University Grants Commission) ही महत्त्वाची पावले उचलली आहेत. यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम. जगदीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रणाली यावर्षीपासूनच लागू केली जाईल.

• या विद्यार्थ्यांना मिळणार सूट:

SC, ST, OBC (नॉन-क्रिमी लेयर), अपंग आणि EWS विद्यार्थ्यांसाठी पीएचडी प्रवेशामध्ये ५% किंवा संबंधित प्रवर्गासाठीची सूट मिळणार आहे. यामुळे चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आता थेट UGC NET साठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतील.

• अर्ज करताना विषय ठरवावे लागतील:

चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. UGC NET परीक्षेसाठी त्यांना विषयाच्या निवडीमध्येही सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आता ते कोणताही विषय निवडू शकणार आहेत. यापुढे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले विषय निवडणे बंधनकारक असणार नाही. मात्र, त्यांना अर्ज करताना त्यांचे विषय ठरवणे अनिवार्य असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T08:19:46Z dg43tfdfdgfd