MUMBAI UNIVERSITY RESULT : मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; अवघ्या २४ दिवसात लागला रिझल्ट

Mumbai University Result : मुंबई विद्यापीठाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ६ या महत्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ४३.५२ एवढी आहे. हा निकाल विद्यापीठाने फक्त २४ दिवसात जाहीर केला आहे. ३० दिवसाच्या आत निकाल जाहीर करण्यासाठी कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे, परीक्षा विभागाचे संचालिका डॉ. पूजा रौंदळे व माजी परीक्षा संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी परिश्रम घेतले.

विद्यापीठाने हा निकाल निर्धारित वेळेच्या आधी जाहीर केला आहे. मागील वर्षी बीकॉम सत्र ६ चा निकाल ६ जून रोजी जाहीर केला होता. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग (OSM) पद्धतीने झाले आहे. सदर बीकॉम बरोबरच उन्हाळी सत्राच्या आजपर्यंत ८ परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत.

या परीक्षेत ५४,९०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५२,४७८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २१,५९२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ४३.५२ टक्के एवढा लागला आहे. २४२३ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ९५ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ८६८८ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत.

मूल्यांकनावर कुलगुरूंचे विशेष लक्ष :

उन्हाळी सत्रात झालेल्या परीक्षेच्या मूल्यांकनावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा . रविंद्र कुलकर्णी व प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे हे सतत लक्ष ठेऊन होते. सर्व परीक्षांचे मूल्यांकन वेळेत होऊन निकाल वेळेत लावण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापकांच्या विशेष बैठका घेतल्या. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यानी मूल्यांकन करून घेण्यात सक्रिय सहभाग दाखविला. यामुळे शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीत देखील उत्तरपत्रिकांचे मोठ्या प्रमाणावर मूल्यांकन केले.

सदरचा निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे तसेच परीक्षा विभागातील कॅप, निकाल व संगणक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मागील दोन दिवस रात्रंदिवस कार्यरत होते. हा निकाल लावण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.

सर्व्हरच्या क्षमतेत वाढ :

५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्याने बीकॉम सत्र ६ च्या आसन क्रमांकानुसार फाईल्स करून त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या. जेणेकरून विद्यार्थ्यास संकेतस्थळावर निकाल पाहणे सुलभ होईल. यासाठी सर्व्हरची क्षमताही वाढविण्यात आली आहे. सदरचा निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे.

निकालावर विशेष लक्ष :

बी.कॉम सत्र ६ चा निकाल हा विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात त्यासाठी परीक्षा,मूल्यांकन व निकाल यावर विशेष लक्ष देण्यात आले.

- प्रा . रविंद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-07T06:52:39Z dg43tfdfdgfd