'सगळं इस्कटून सांगतो, झालाय ५० लाख मतांचा झांगडगुत्ता'; अभिनेत्याचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

मुंबई: अभिनेते किरण माने सध्या त्यांच्या राजकीय विषयांवरील सोशल मीडिया पोस्टसाठी विशेष चर्चेत येतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अभिनेत्याच्या विविध प्रतिक्रिया आणि त्यांच्या पोस्ट चर्चेत येतात. यावेळी त्यांनी संसदेतून निलंबन झालेल्या खासदारांच्या विषयावरुन आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात किती मतदान झालं, यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे. यातूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. नेमकं काय म्हणाले किरण माने, घ्या जाणून...

किरण माने यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी...

"सगळं इस्कटून सांगतो, नीट समजून घ्या. एकशे सेहेचाळीस खासदार निलंबित केले या हुकूमशहांनी. त्यातले अठ्ठ्याहत्तर खासदार एका दिवसांत संसदेतून बाहेर काढले. अचानक का केलं असं? हे शोधण्यासाठी आपण त्यानंतर काय झालं हे तपासून पाहू. गौतम बुद्धांचा 'कारणकार्यसंबंध' विसरायचा नाही. तुकोबारायांनीही 'क्षीर आणि पाणी' निवडून काढायला शिकवलंय आपल्याला. निलंबन केलेल्यांची यादी पहा. सगळे तडफेने विरोधात बोलणारे होते. चुकीवर बोट ठेवणारे होते. ते बाहेर केले. शिल्लक कुणाला ठेवलं? यांच्या तालावर नाचणार्‍या बुजगावण्यांना. यांनी काहीही बोललं तरी पेंगत पेंगत बाकं वाजवणार्‍यांना, इशारा केला की हात वर करून समर्थन करणार्‍यांना...

निलंबनानंतर या बगलबच्च्यांची मदत घेऊन त्यांनी काही विधेयकं संसदेत घाईघाईने मंजूर केली. त्यामध्ये एक होत निवडणूक आयुक्तांची नेमणूक! पुर्वी पंतप्रधान, विरोधीपक्षनेता आणि सरन्यायाधीश अशी समिती होती. त्यातून सरन्यायाधीशांना डच्चू देऊन 'केंद्रीय मंत्री' घुसवला, काहीही निर्णय घेताना 'दोन विरुद्ध एक' असंच होणार याची संपूर्ण तजवीज करून ठेवली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका आयुक्तांनी राजीनामा दिला त्याला हेच कारण असावं. आता मुद्याचं बोलूया....

दोन टप्प्यांचे मतदान पार पडले. हल्ली डिजिटल युग असूनसुद्धा निवडणुक आयोगानं लै लै लै डोकेफोड करून आकडेवारी जाहीर केली. पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यावर अकरा दिवस आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यावर सहा दिवस झटापट चाललीवती.. अखेर शेवटी एकूण किती मतदान झालं हे जुगाड जुळवलं त्यांनी एकदाचं! ही आकडेवारी जर आपण तपासली तर या बांडगुळांनी हजार-दोन हजार नाही, तर पन्नास लाख मतांचा झांगडगुत्ता केलेला आहे. पन्नास लाख मतं वाढवलेली आहेत. हे मतदान केलं कुणी? हा गंभीर सवाल आहे.

विचार करा. देश भयानक परिस्थितीकडे चाललेला आहे. देशहितासाठी जनतेनं अनेक गोष्टींचे निर्णय आता स्वत:च्या हातात घेण्याची वेळ आलेली आहे. न्याय मिळवण्याच्या आंदोलनासाठी तयार रहायला पाहिजे. आत्तापर्यन्त एक बोट सरकार बदलू शकत होतं. त्या बोटामागे एक मनगट आहे आणि त्या मनगटाच्या वर एक बलदंड बाहू आहे... सगळ्यात वर सर्वशक्तीमान मेंदू आहे. मध्ये कुठेतरी या देशातील गोरगरीब जनतेविषयी कळवळा असणारं 'काळीज'सुद्धा आहे. या सगळ्याचा आता यथोचित संवैधानिक वापर करायची वेळ आलेली आहे. कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारों!- किरण माने."

अभिनेते किरण माने यांनी पहिल्या दोन टप्प्यात बनावट मतदान झाल्याचा थेट आरोप केला आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांमधील नेतेमंडळींकडून काही प्रतिक्रिया येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

माने यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ते शेवटचे 'सिंधूताई माझी माई' या कलर्स मराठीवरील मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी अनाथांची माय सिंधूताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर माने यांची विशेष चर्चा 'बिग बॉस मराठी ४' आणि 'मुलगी झाली हो' या कार्यक्रमांमुळे झाली होती.

2024-05-03T16:00:03Z dg43tfdfdgfd