मराठी NOT WELCOME म्हणणाऱ्यांना मत देऊ नका... रेणुका शहाणे संतापल्या; ट्वीट करत म्हणाल्या, अशा लोकांना...

मुंबई- काही दिवसांपूर्वी एका कंपनीच्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला होता. या कंपनीच्या जाहिरातीसाठी मराठी लोकांनी अर्ज करू नये, असं सांगण्यात आलं होतं. या कंपनीच्या मुंबईत असलेल्या एचआर रिक्रूटरच्या लिंक्डइन प्रोफाईलवरून ही जाहिरात करण्यात आली होती. खरी मुंबई ही मराठी माणसांची असल्यामुळे मुंबईमध्येच मराठी माणसाला नोकरी नाकारल्याने नेटकरी संतप्त झाले. त्यानंतर अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर याबाबतीत संतप्त होऊन त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आता रेणुका शहाणे यांनी सुद्धा या संबंधी ट्विट केलंय.

रेणुका शहाणे या बॉलिवूड अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. 'हम आपके है कौन', 'त्रिभंगा' यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. रेणुका नेहमीच त्यांचं मत स्पष्टपणे मांडत असतात. सध्या निवडणूकीचं वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेणुका यांनी त्यांचं मत मांडलंय. आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याच निमित्ताने रेणुका शहाणे यांनी त्यांच्या X अकॉउंटवरून ट्वीट केलंय. या ट्वीटद्वारे त्यांनी मराठी भाषिकांना कमी लेखणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

रेणुका काय म्हणाल्यारेणुका यांनी संतप्त होऊन ट्वीट करत लिहिलंय की, 'मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका', 'मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका', 'ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका' 'कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे'.

रेणुका यांनी केलेलं ही ट्वीट व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जाहिरात तिच्या लिंक्डइनच्या प्रोफाईलवर शेअर केली होती. मात्र, जाहिरातीमध्ये एचआरने 'येथे मराठी लोकांचे स्वागत नाही' असं लिहिलं होतं.

2024-05-07T08:58:40Z dg43tfdfdgfd