संग्रहालय नव्हे; राष्ट्रीय तीर्थस्थळ

अनिल टाकळकर, वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी या सुंदर राजधानीच्या वैभवात स्मिथसोनियनच्या विविध संग्रहालयांनी मोलाची भर टाकली आहे. यातील अमेरिकन इतिहासाचा मागोवा घेणारे संग्रहालय हे तर त्याबाबतचा आदर्श वस्तुपाठ ठरेल. इतिहासाची नाळ वर्तमानाशी जोडून भविष्याला आकार देणारे ते राष्ट्रीय तीर्थस्थळ अशी त्याची ओळख करून देता येईल.

भारत दर्शन : नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय

प्राचीन आणि आधुनिकता यांचा मनोहारी संगम असलेली वॉशिंग्टन डीसी ही राजधानी अतिशय देखणी आणि प्रसन्न असून ती ‘म्युझियम हब’ म्हणूनही ओळखली जाते. ऐतिहासिक कॅपिटल हिल (संसद भवन)पासून लिंकन मेमोरिअलचा नॅशनल मॉलचा सुंदर परिसर काळजीपूर्वक राखलेल्या हिरवळीच्या पट्ट्यांनी, डेरेदार वृक्षांनी, रंगीबेरंगी फुलांनी, तलावांनी, कारंजांनी निसर्गरम्य दिसतो. या परिसराच्या नजीक असलेली विविध म्युझियम्सही या शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारी ठरत आहेत. अमेरिकेच्या इतिहासाची, संस्कृतीची, विविध चळवळींची, समाज घटकांच्या वैशिष्ट्यांची तसेच या देशाच्या अंतराळ आणि इतर क्षेत्रातील अफाट प्रगतीची ओळख करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यामागे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटचे योगदान किती महत्त्वपूर्ण आहे, हे या संग्रहालयांना भेट दिल्याशिवाय कळणार नाही.

तब्बल 21 म्युझियम्स

अमेरिकन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास असो, नॅचरल हिस्टरी असो, आफ्रिकन अमेरिकन समाजाची वाटचाल असो वा हवाई आणि अंतराळ विज्ञानातील प्रगती असो... अशा विविध विषयांना वाहिलेली 21 म्युझियम्स या संस्थेने उभारली. जेम्स स्मिथसन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने दिलेल्या उदार देणगीतून त्यांच्या नावाने ही संग्रहालये आकार घेऊ शकली. ज्ञानाचा खजिना सर्वांना उपलब्ध व्हावा, ही त्यांची इच्छा या संस्थेच्या माध्यमातून आकाराला आली. 1846 च्या स्थापना वर्षानंतर या ‘स्मिथसोनियन’ने गेल्या 178 वर्षांत आपल्या संग्रहालयांसाठी अथक संशोधन आणि संकलन करून सातत्याने त्यात नवनवीन मौल्यवान बाबींची भर घातली आहे. अमेरिकेत शिक्षण, अभ्यास, संशोधन, ऐतिहासिक वारसा आणि ज्ञान भांडार याला किती महत्त्व आणि आदराचे स्थान आहे, याची खूणगाठ या भेटीतून बांधता येते. या संग्रहालयापैकी नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन हिस्टरीला भेट देऊन त्याच्या उभारणीमागील प्रेरणा समजावून घेण्याची संधी वॉशिंग्टन डीसी येथील फॉरेन प्रेस सेंटरने इथे काम करणार्‍या परदेशी पत्रकारांना अलीकडेच दिली. वर्तमान समजावून घेण्यासाठी भूतकाळातील मुळापर्यंत जाण्याची गरज असते. त्यातून भविष्याला आकार देण्याची प्रेरणा मिळते ही भूमिका येथील क्युरेटर लिसा कॅथलिन ग्रॅडी, क्लेरी जेरी आणि मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर वॅलेस्का एम हिल्बिग यांनी चर्चेतून अधोरेखित केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या आणि येथील सर्व संग्रहालयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा इथे केलेला अचूक वापर. त्यातही ऐतिहासिक संदर्भ समजावून घेण्यासाठी टचस्क्रीन आणि इंटरअ‍ॅक्टिव्ह डिस्प्ले, एखादा ऐतिहासिक प्रसंग, घटना किंवा वस्तू मूळ द़ृश्यात कशी दिसत होती, याचा अनुभव घेण्यासाठी ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर), जगातील कोणत्याही भागातून ऑनलाईन म्युझियम पाहता येण्यासाठी आभासी प्रवेश आणि आभासी टूर, अर्टिफॅक्टस्चे थ्रीडी स्कॅनिंग आणि मॉडेलिंग, डिजिटल लर्निंग साधने, ऑडिओ गाईडस् उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्स, म्युझियममध्ये आलेल्या अभ्यागतांच्या स्मार्टफोनवर थेट माहिती पोहोचविण्यासाठी बिकन तंत्रज्ञान, इथे आलेल्या पर्यटकांनी कोणकोणत्या बाबी नजरेखालून घातल्या, त्यांची अधिक पसंती कशाला होती आदी जाणून घेण्यासाठी त्यांचे ट्रॅकिंग आणि अ‍ॅनॅलिटिक्स, व्हिडीओ, ऑडिओ, इंटरअ‍ॅक्टिव्ह टाईमलाईन आदींंच्या सहाय्याने डिजिटल कथाकथन तंत्र, व्याप्ती वाढविण्यासाठी सोशल मीडिया, म्युझियमच्या संग्रहात भर घालता यावी म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने विविध कथा आणि अर्टिफॅक्टस्साठी क्राऊडसोर्सड् कलेक्शन, एखादा ऐतिहासिक प्रसंग जिवंत असण्याचा भास निर्माण करण्यासाठी मोठ्या भिंतीवर त्याचे प्रक्षेपण (प्रोजेक्शन मॅपिंग तंत्रज्ञान) आदी असंख्य बाबींचा उल्लेख करता येईल. दुर्मीळ वस्तूंचे जतन करण्यासाठी एक्स रे आणि इन्फ्रारेड स्कॅनिंगसारख्या इमेजिंग तंत्राचाही वापरही इथे केला जातो. हा मौल्यवान ठेवा सुरक्षित ठेवण्यासाठी हाय डेफिनेशन टेहळणी कॅमेरे. मोशन डिटेक्टर्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) ट्रॅकिंग इथे पाहायला मिळाले.

विविध संस्कृतींचा मेल्टिंग पॉट

अमेरिका हा मुळात स्थलांतरितांचा देश. इथे सुरुवातीला युरोपियन स्थलांतरित आले. त्यानंतर ब्रिटिशांनी वसाहत स्थापून इथे राज्य केले. त्यांच्याशी सशस्त्र संघर्ष करून या देशाला स्वातंत्र्य मिळवावे लागले. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यासारख्यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याचा आणि क्रांतीचा इतिहास इथे घडला. तो सारा भाग इथे पाहता येतो. या देशातील यादवी युद्ध, गुलामगिरी प्रथा निर्मूलन संघर्ष, 1964 चा सिव्हिल राईटस् अ‍ॅक्ट, स्वातंत्र्याचा जाहीरनामा, बिल ऑफ राईटस्, 1965 चा मतदान हक्क कायदा, महिला हक्क चळवळी, त्यांना मतदानाच्या हक्कासाठी द्यावा लागलेला लढा, कामगार तसेच कृष्णवर्णीय चळवळ, पर्यावरण आंदोलने, ग्रेट डिप्रेशनचा कालखंड, त्यातून झालेला सोशल सिक्युरिटीच्या संकल्पनेचा जन्म, दुसरे महायुद्ध, त्यातून अमेरिकेकडे आलेले जागतिक नेतृत्व, शीतयुद्ध, त्यातून आकाराला आलेले या देशाचे परराष्ट्र धोरण, उद्योग तंत्रज्ञानातील अंतराळ विज्ञानातील अफाट प्रगती आणि आता आलेले एआयचे तंत्रज्ञान, येथील मायावी हॉलीवूड, मनोरंजनाची विस्मयकारी दुनिया इत्यादी सारे टप्पे या भूतकाळ ते वर्तमानाच्या प्रवासात इथे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत, असे वाटते. येथील आतापर्यंतच्या अमेरिकेच्या अध्यक्षांची, त्यांच्या सहचारिणींची म्हणजे फर्स्ट लेडीजची ओळख, या देशाने जपलेले लोकशाही, स्वातंत्र्य, समता यांचे मूल्य, अमेरिकन ड्रीमचा खरा अर्थ आणि हा देश बहुसांस्कृतिक बहुवांशिक मेल्टिंग पॉट कसा झाला आहे, याची झलक हे सारेही हे संग्रहालय आपल्याला दाखवते.

अठरा लाखांवर अर्टिफॅक्टस्

इथे असणार्‍या अर्टिफॅक्टची संख्या तब्बल 18 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे येथील काही निवडक अर्टिफॅक्टस्चा मागोवा आपल्याला घ्यावा लागेल. या देशाचा मूळ स्वरूपातील राष्ट्रध्वज हे या म्युझियमचे सर्वात मोठे आकर्षण. 1812 च्या बाल्टिमोर युद्धात फोर्ट मॅक हेन्री हा ध्वज फडकाविण्यात आला होता. ट स्टार स्पँगल्ड बॅनर म्हणून तो ओळखला जातो. ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढ्याची ही आठवण असून या देशाचे ते राष्ट्रगीतही आहे. हा ध्वज बघून त्यावेळी सैनिकांच्या सुटकेच्या मोहिमेवर गेलेले तरुण वकील फ्रान्सिस स्कॉट की यांना देशभक्तीपर कविता करण्याची स्फूर्ती मिळाली. तेच पुढे राष्ट्रगीत झाले. देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक, मौलिक ऐतिहासिक ठेवा म्हणून त्याचे महत्त्व आजही कायम आहे. 1907 मध्ये हा ध्वज म्युझियमच्या संग्रहात आला, त्यावेळी तो अत्यंत वाईट स्थितीत होता. आधी तो अंधार्‍या खोलीत होता व अधूनमधून प्रदर्शित केला जात असे. पण 1999 मध्ये त्याचे नीट जतन करण्याच्या योजनेत त्याच्यासाठी खास डिस्प्ले केस क रून घेतली. तसेच हवामान नियंत्रित ठेवून त्याचे आयुष्यही वाढविले. भूतपूर्व अध्यक्षांपैकी अब्राहम लिंकन यांची हॅट आणि ते वापरत असलेले सोन्याचे घड्याळ इथे पाहिले. त्यांची हत्या झाली, त्या रात्री ही हॅट त्यांनी घातलेली होती. फोर्ड थिएटरमध्ये ती एका सैनिकाला सापडली. त्याने पुढे एका संग्राहकाला विकली. 1923 मध्ये ती नंतर म्युझियमने मिळवली.

फर्स्ट लेडीजचा स्वतंत्र विभाग

जॉर्ज वॉशिंग्टनचा 12 टन वजनाचा हातात तलवार घेतलेला भव्य संगमरवरी पूर्णाकृती पुतळाही इथे लक्ष वेधून घेणारा आहे. त्यांनी क्रांतिकारी युद्धात घातलेला युनिफॉर्मही या संग्रहालयात आहे. अमेरिकेच्या संस्थापक शिल्पकारात माजी अध्यक्ष थॉमस जेफरसन यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी ज्या डेस्कवर बसून स्वातंत्र्याचा जो जाहीरनामा लिहिला, ते डेस्कही इथे पाहता येते. आतापर्यंतच्या अध्यक्षांनी वापरलेल्या विविध वस्तू, फर्स्ट लेडीजने परिधान केलेले समारंभातील फॅशनेबल उंची गाऊन्स, लाईट बल्ब, फोनोग्राफ, मोशन पिक्चर कॅमेरा आदी शोधांचे जनक थॉमस एडिसन यांच्या संशोधनापैकी एका लाईट बल्बचे प्रोटोटाईप, अपोलो इलेव्हन कमांड मॉड्युल कोलंबिया (ज्या मिशनमधून नील आर्मस्ट्राँग आणि इतर अंतराळवीर चंद्रावर उतरले त्या मिशनची आठवण) मोहम्मद अलीचे बॉक्सिंग ग्लोव्हज्, नाईन एलेव्हनच्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींची अनेक प्रतीके इत्यादी अनेक प्रसंगांची आणि व्यक्तींची आठवण हा फेरफटका करून देतो.

सांगली : प्रतापसिंह उद्यानात साकारतेय पक्षी संग्रहालय

2024-09-07T23:38:26Z dg43tfdfdgfd