वेळापत्रकानुसार मुंबई ते पनवेल प्रवास अवघ्या ९ मिनिटांत? एसटी आरक्षणाच्या वेबसाईटवरील प्रताप

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : बातमीचा मथळा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, मात्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. सामान्यत: मुंबई ते पनवेल या रस्तेमार्गे प्रवासासाठी किमान दीड तास लागतो. वाहतूककोंडीत अडकल्यास हा प्रवास दोन तासांवर जातो. मात्र, एसटी आरक्षणाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार, मुंबई ते पनवेल प्रवास अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण होत असल्याचे दाखवले आहे.

मुंबई सेंट्रलहून नारायणगावला जाणारी एसटी बस मुंबई सेंट्रलहून सकाळी ६.१५ वाजता मार्गस्थ होते. वाशी आगारात ती ६.१९ वाजता पोहोचते, तर पनवेलसाठीची वेळ ६.२४ आहे, असे आरक्षण संकेतस्थळावर दिसते आहे. प्रवासी याच वेळेनुसार घरातून निघतात. मात्र एसटी एक ते दोन तास विलंबाने येत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागते.

सुट्टीच्या हंगामात बसून प्रवास करता यावा, यासाठी आरक्षण करून प्रवास करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. त्यासाठी मोबाइल अॅप आणि संकेतस्थळावरून आरक्षण केले जाते. आरक्षणाच्या तिकिटांवर गाडी सुरू होण्याच्या स्थानकावरील वेळ छापली जाते. प्रवासी त्या वेळेनुसार स्थानकावर/थांब्यावर पोहोचतात. मात्र प्रत्यक्षात तास-दोन तासांनी बस येत असल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडत आहे. आरक्षण संकेतस्थळावर वेळ चुकीची आहे. दुसरीकडे, आगारातून किंवा स्थानकातून निघणाऱ्या अनेक गाड्या आरक्षण संकेतस्थळावर दिसत नाही. मर्यादित एसटी बस असल्याने उपलब्ध गाड्यांचे आरक्षण पूर्ण दिसते. यामुळे एसटीचा प्रवासाच्या आरक्षणाचे वाईट अनुभव असल्याचे अनेक प्रवासी सांगतात

केवळ ३० टक्के गाड्यांचे आरक्षण

एसटी महामंडळाचे नवे मोबाइल अॅप आणि संकेतस्थळावर आरक्षण करताना, आसन निवडल्यानंतर पैसे खात्यातून वजा होतात. मात्र तिकीट आरक्षित होत नाही, असा अनुभव सार्वजनिक बससेवेसाठी कार्यरत

मुंबई-कोल्हापूरसारख्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या संकेतस्थळावर दिसत नाहीत. एकूण गाड्यांपैकी अवघ्या ३० टक्केच गाड्या प्रवासी आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. यामुळे अॅप आणि संकेतस्थळात सुधारण्यासाठी अद्याप बराच वाव आहे.

- रोहित धेंडे, संस्थापक, बस फॉर अस फाउंडेशन (प्रवासी संघटना)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T03:44:47Z dg43tfdfdgfd