पुण्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार बरसणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुणे शहर घाटमाथ्यासह जिल्ह्याला हवामान विभागाने ७ ते ९ सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील तीन दिवस अतिमुसळधार

खडकवासला धरणातील विसर्ग शुक्रवारी (दि.७) कमी करण्यात आला, तरीही सायंकाळी भिडे पूल पाण्याखाली गेल्याने तेथील रहदारी बंद केली आहे. गेले काही दिवस राज्यातील इतर भागांतून पाऊस गायब झाला असला, तरी पुणे शहरात मात्र पाऊस सुरूच आहे. दररोज रिमझिम पावसाची हजेरी आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी शहरात गार वारे सुटून पावसाला सुरुवात झाली. शहराला काळ्याभोर ढगांनी घेरले.

हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शहरात मासूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे घाटमाथ्यासह पुणे शहर आणि जिल्ह्याला अतिमुसळधारेचा इशारा दिला आहे.

विसर्ग केला कमी, पण

विसर्ग केला कमी, पण...खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रात सुरू असणारा विसर्ग शुक्रवारी दुपारी ३ वाजता विसर्गाचा वेग ११ हजार क्युसेकवरून ८ हजार ७३४ इतका केला आहे. मात्र, हे सोडलेले पाणी सायंकाळी भिडे पुलापर्यंत आले, त्यामुळे हा पूल सायंकाळी ६च्या सुमारास पाण्याखाली गेला. त्यामुळे तेथील रहदारी बंद करण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी (दि.७) शहरात झालेला पाऊस (मिमीमध्ये)

  • शिवाजीनगर : ०.२

  • लोहगाव : ०.२

  • तळेगाव : १

असे आहेत अलर्ट

  • ऑरेंज अलर्ट: (अतिमुसळधार) ७ व ८ सप्टेंबर

  • यलो अलर्ट : (मुसळधार): ९ व १० सप्टेंबर

2024-09-07T07:26:49Z dg43tfdfdgfd