नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, माझीही रावेरमधून हॅट्रिक व्हावी; रक्षा खडसेंचं हनुमंताकडे साकडं

निलेश पाटील, जळगाव : रावेर लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी खास इच्छाही व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि रावेर लोकसभेतून तिसऱ्यांदा माझी हॅट्रिक होण्यासाठी मी आज हनुमानाला साकडे घातले असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

रावेर लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षा खोडसे यांना भाजपातर्फे तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर झाल्याने या पंचवार्षिकला त्यांची हॅट्रिक होण्यासाठी त्यांनी देवाकडे साकडं घातलं. आज हनुमान जयंती उत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळे येथील प्रसिद्ध असलेल्या हनुमानाचे दर्शन घेऊन त्यांनी देवाकडे साकडे घातले आहे.

एकनाथ खडसे हे भाजप प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर रावेर लोकसभामध्ये राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र अद्याप त्यांचा प्रवेश रखडला गेला असल्याने खासदार रक्षा खडसे यांनाच या निवडणुकीचे मैदान मारायचे आहे. त्यामुळे रक्षा खडसे या दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निवडणूक पार पाडल्या, मात्र ही निवडणूक पहिल्यांदाच रक्षा खडसे या स्वतंत्र निवडणूक लढवीत आहे.

खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर श्रीराम पाटील यांचे आव्हान उभे ठाकले आहे. श्रीराम पाटील हे एक मोठे उद्योजक म्हणून त्यांचा परिचय आहे तर खासदार रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून तसंच दोन पंचवार्षिक म्हणून त्यांनी रावेर लोकसभेचे लोकप्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे खडसे यांना या भागाचा राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात अनुभव आहे.

आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसे यांनी आज बोदवड येथील शिरसाळा हनुमानाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करून हनुमानाला विजयाचे साकडे घातलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि रावेर लोकसभेतून माझी देखील हॅट्रिक व्हावी आणि जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा मला तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून द्यावे, हीच मागणी हनुमानाकडे खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T15:28:21Z dg43tfdfdgfd