नाशिकच्या बँकेतून कोट्यवधीचं सोनं लंपास; चोरट्यानं 'असं' उघडलं लॉक, VIDEO

नाशिक, लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बँकेच्या सेफ्टी लॉकरमधून थोडेथीडके नाही, तर जवळपास पाच कोटी रुपयांचे दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेत ही घटना घडली आहे. सेफ्टी लॉकर किल्लीने उघडून ४ कोटी ९२ लाखांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. दरम्यान, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, व्हिडीओ समोर आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या जुना गंगापूर नाका परिसरात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीचे कार्यलाय आहे. इथं सेफ्टी लॉकरमध्ये २२२ ग्राहकांचे १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते. शनिवारी एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी गेले असताना लॉकर उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. लॉकरमध्ये सोने नसल्याने सर्वजण हादरले.

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक रणजित देशमुख यांना लॉकरमध्ये सोने नसल्याबाबत कळवलं. बँकेचे व्यव्यवस्थापक रणजित देशमुख यांनी जयेश कृष्णदास गुजराथी याना माहिती दिली. त्यांनीही लॉकरची पाहणी केली असता ते रिकामं असल्याचं आढळून आलं. जयेश यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती सेफ्टी लॉक उघडून लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या दागिण्यांवर डल्ला मारताना दिसत आहे. मात्र त्याने मास्कचा वापर केल्यामुळे तसेच जॉकेट घातल्यामुळे त्याचा चेहरा समोर आलेला नाहीये.

2024-05-06T05:27:49Z dg43tfdfdgfd