दख्खनचा राजा जोतिबा..!

[author title=”- सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक” image=”http://”][/author]

हजारो वर्षांची समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणार्‍या भारतीय आध्यात्मिक संस्कृतीमध्ये भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांचे एक वेगळे महत्त्व आहे. श्री सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, श्री महाकाल, श्री ओंकारेश्वर, श्री वैद्यनाथ, श्री भीमशंकर, श्री त्र्यंबकेश्वर, श्री केदारनाथ, श्री रामेश्वर, श्री नागेश्वर, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर ही 12 ज्योतिर्लिंगांची ठिकाणे आहेत. या देवतांमध्ये केदारनाथ हे अग्रस्थानी आहेत.

प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्त्व आहे आणि त्याविषयीच्या पुराणकथा, लोककथा भगवान शंकरांच्या भक्तांमध्ये प्रचलित आहेत. यामध्ये देवाधिदेव महादेवांनी घेतलेल्या विविध अवतारांचे संदर्भ आढळतात. भगवान शंकर असोत, विष्णू असोत, गणेश असोत किंवा जगज्जननी देवीमाता असो, त्यांच्या विविध अवतारांमुळे अनेक देवदेवतांची मालिका अखंड भारतभर दिसून येते. या सर्व देवतांमध्ये श्री केदारनाथ हे अग्रस्थानी आहेत. हा देव सर्व अवतारांमध्ये पूर्ण अवतार मानला जातो. केदारनाथाने जोतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली म्हणून त्यांना ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणांचे स्मरण म्हणून हिमालयातील बद्रिकेदार लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग, असेही म्हणतात. या केदारनाथांना देवी श्री अंबाबाईने दख्खनचा राजा हे नाव अर्पण केले. कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचे देवस्थान म्हणजे हाच दख्खनचा राजा. या देवस्थानाला दक्षिण काशी, असे म्हटले जाते. जोतिबा डोंगराचा पुराणात ‘मैनागिरी पर्वत’ असा उल्लेख आढळतो. देवी अंबाबाईला रत्नासुर, कोल्हासुर या राक्षसांनी त्रास देण्यास सुरुवात केली, तेव्हा सर्व देवांच्या विनंतीवरून पूर्णब—ह्म सनातन अशा ज्योतिर्मय स्वरूपाच्या रूपात जोतिबा अवतीर्ण झाले आणि सर्व राक्षसांच्या त्रासातून अंबाबाईची सुटका झाली, असे सांगितले जाते. जेव्हा केदारनाथ परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हा अंबाबाईने त्यांना थांबण्याची विनंती केली. अंबाबाईच्या विनंतीवरून केदारनाथ करवीरकडे दक्षिण दिशेला कृपाद़ृष्टी करून उभे राहिले. त्यावेळी सर्व ऋषी, देव व अंबाबाईदेवीने त्यांचा दक्षिणाधीश दख्खनचा राजा असा गौरव केला.

कोल्हापूरच्या वायव्येस साधारण 20 किलोमीटर अंतरावर जोतिबा डोंगर आहे. जोतिबाला गुलाल, दवणा, खोबरे, खारीक प्रिय आहे. दवण्याचा गंध हा रज, तम, सत्त्व गुणयुक्त आहे. जोतिबाची मूर्ती चतुर्भुज असून, हाती खङ्ग, त्रिशूल, डमरू या आयुधांसह उभी आहे. त्यांचे वाहन घोडा आहे. जोतिबाची मुख्य मूर्ती ही सुमारे 4 फूट 3 इंच उंचीची असून, ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. चतुर्भुज असणारी ही मूर्ती डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात भरणारी जोतिबाची यात्रा हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांसाठी भक्तिसोहळा असतो. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ असे म्हणत या चैत्री यात्रेत 96 सासनकाठ्या सहभागी होतात. या सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पहिला मान निनाम पाडळीच्या सासनकाठीस असल्याची नोंद इतिहासकालीन ताम—पटावर आढळते. सासनकाठी म्हणजे सुमारे 30 ते 35 मीटर उंचीचे जाड निशाण, पांढरा फरारा व तीन चुनी तोरणे बांधलेले असते. निनाम पाडळी येथून प्रतिवर्षी जोतिबाकडे 20 ते 25 बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात. सोबत हजारो ग्रामस्थ, भाविक पायी प्रवास करतात.

जोतिबा मंदिराला भारताच्या प्राचीन स्थापत्य कलाशास्त्रामध्येही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने असून, त्याची रचना प्राचीन काळातील स्थापत्यकलेची साक्ष देणारी आहे. सुमारे 57 फूट लांब आणि 37 फूट रुंद असणार्‍या या मंदिराच्या शिखराची उंची 77 फूट आहे. मंदिरात प्रवेश करताना प्रथम भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. यातून प्रवेश केल्यानंतर तीन मंदिरांचा समूह द़ृष्टीस पडतो. या तीन मंदिरांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. संत नावजीनाथ नावाचे जोतिबाचे एक परमभक्त होते आणि त्यांनी या मूळ देवालयाचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. तथापि, आताचे मंदिर 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी भव्य स्वरूपात पुनःरचित करून बांधलेले आहे. हे मंदिर साधे असून, त्याचे बांधकाम उत्तम प्रतिच्या काळ्या बेसाल्ट दगडात केले आहे.

या मंदिराशेजारी केदारेश्वराचे देवालय असून, त्याचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केले आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. केदारेश्वर मंदिरासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. या मंदिरातील रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम-पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराजवळच चोपडाईदेवीचे मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिंमतबहादूर यांनी केले आहे. येथून जवळच यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थे असून, जवळच 6 कुंड व दोन विहिरी आहेत. येथील मंदिरे ही हेमाडपंती पद्धतीची असून, तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव त्यामध्ये स्पष्ट रूपाने आढळतो. जोतिबा मंदिराच्या प्रांगणातील दगडी दीपमाळ ही भाविकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. मंदिरामध्ये दररोज श्रींची वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधली जाते. जोतिबाचे दर्शन घेण्याआधी काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. प्राचीन काळापासून दर रविवारी व श्रावण शुद्ध षष्ठीला जोतिबा मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. हजारो-लाखो भाविक लाडक्या कुलदेवाचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घेतात आणि त्याचा कृपाशीर्वाद घेऊन माघारी फिरतात. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक दरवर्षी या यात्रेला येतात आणि जोतिबा डोंगर गर्दीने फुलून जातो.

2024-04-23T01:57:43Z dg43tfdfdgfd