जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी ताफ्यातील दोन वाहनांपैकी एका वाहनाला लक्ष्य केले आणि अंदाधुंद गोळीबार केला. या पार्श्वभूमीवर पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या जवानांकडून कडक सुरक्षा तपासणी सुरू आहे.

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या पाच जवानांपैकी एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. आणखी एका जवानाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर उर्वरित तीन जण स्थिर आहेत, असे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवर सांगितले की, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हवाई दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली जात आहे.

पूंछमध्ये या वर्षातील दुसरा दहशतवादी हल्ला

पुंछमध्ये लष्कराच्या ताफ्यावर या वर्षातील हा दुसरा हल्ला आहे आणि गेल्या डिसेंबरनंतरचा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी १२ जानेवारी रोजी कृष्णा घाटी भागात दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांना लक्ष्य केले होते, ज्यात चार जवान शहीद झाले होते. त्याआधी २२ डिसेंबर २०२३ रोजी डेरा की गली भागात लष्कराच्या वाहनांवर हल्ला झाला होता. आता हा तिसरा हल्ला आहे. या तीन हल्ल्यांमध्ये पाच जवान शहीद झाले, तर अनेक जवान जखमी झाले.

2024-05-05T02:49:19Z dg43tfdfdgfd