कॅनडात 3 भारतीयांना अटक, निज्जरच्या हत्येशी संबंध; भारतावर होतोय आरोप

दिल्ली : कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणी शुक्रवारी तीन भारतीय नागरिकांना अटक केली. कॅनडातील माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. कॅनडा पोलिसांचे म्हणणे आहे की, अटक केलेले लोक त्या कथित गटाचे सदस्य आहेत ज्यांना भारत सरकारने निज्जरची हत्या करायला सांगितलं होतं. निज्जरच्या हत्येचा आरोप तिघांवर करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे सादर केलेल्या कागदपत्रांमधून तिघेही भारतीय असल्याची माहिती समोर आलीय.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय एजंटवर निज्जरच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला होता. यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले होते. भारताने ट्रुडोंच्या आरोपांना बिनबुडाचे असल्याचं म्हणत फेटाळलं होतं. पोलिसांनी तिघांना शुक्रवारी कॅनडातील दोन प्रांतातून अटक केल्याची माहिती समजते. सूत्रांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी या लोकांची ओळख पटवली होती. ते निज्जरच्या हत्या प्रकरणात असल्यानं त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांना अटक केली असून त्यांच्यावर आरोप आहे की ज्या दिवशी निज्जरची हत्या झाली तेव्हा तिघांनी शूटर, वाहन चालक म्हणून काम केलं. सीटीव्ही न्यूजने वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर निज्जरच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार अटक केलेल्या तिघांची नावे करणप्रीत सिंह, कमलप्रीत सिंह आणि करण बराड अशी आहेत. त्यांच्यावर निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही आहे. ग्लोबल न्यूजच्या एका वृत्तामध्ये संशयितांची ओळख भारतीय नागरिक अशी सांगण्यात आलीय.

2024-05-04T02:04:37Z dg43tfdfdgfd