अरविंद सावंत आजही राहतात भाड्याच्या घरात

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मुंबईचे शिवसेना(ठाकरे) पक्षाचे विद्यमान खासदार व 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार अरविंद सावंत हे आजही भाड्याच्या घरात राहतात. 1979 पासून शिवडीतील मिठीबाई इमारतीत भाड्याने राहत असल्याची माहिती सावंत यांनी आपल्या शपथपत्रात दिली आहे.

सावंत यांच्याकडे एकही वाहन नसून ते आतापर्यंत भाड्याच्या घरात राहत असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सावंत यांच्याकडे 2 कोटी 13 लाख 19 हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे 2 कोटी 56 लाख 65 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. सावंत यांच्याकडे 1 कोटी 92 लाख 34 हजार रुपयांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 1 कोटी 73 लाख 58 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच दोघांकडे मिळून 60 लाख 80 रुपयांचे सोने व चांदी आहे. त्यांची एकूण मालमत्ता 4 कोटी 39 लाख 97 हजार 191 रुपये असून 2019 मध्ये त्यांची एकूण मालमत्ता ही 2.71 कोटींची होती. पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत जवळपास दीड कोटींहून अधिक रकमेची वाढ झाली आहे.

देसाईंच्या मालमत्तेत 6 वर्षात 4 कोटींची वाढ

लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रथमच उतरलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रकानुसार, देसाई यांच्या नावे एकूण 3 कोटी 85 लाख 71 हजार 323 रुपयांची आणि पत्नीच्या नावे 2 कोटी 96 लाख 89 हजार 326 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर देसाईंकडे 5 कोटी 68 लाख 92 हजार व त्यांच्या पत्नीकडे 9 कोटी 12 लाख 31 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. देसाईंकडे एकूण 6.82 कोटींची जंगम तर 14.81 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची एकूण मालमत्ता 21 कोटी 63 लाख 83 हजार 649 रूपये आहे.

2018 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यावेळेस त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती 17 कोटी 52 लाख होती. या संपत्तीत 4.11 कोटींची वाढ झाली आहे.

देसाईंकडे सध्याच्या घडीला 75 हजार रोख, तर पत्नीकडे 1 लाख रुपये रोख रक्कम आहे. देसाईंकडे 530 ग्रॅम सोने आणि 2 हजार ग्रॅम चांदी असून दोघांची किंमत 36 लाख 89 हजार 800 रुपये इतकी आहे. तर पत्नीकडे 2300 ग्रॅम सोने आणि 5 ग्रॅम चांदी असून दोघांची किंमत 1 कोटी 57 लाख 18 हजार रुपये इतकी आहे. देसाईंच्या नावे एकूण स्थावर मालमत्ता 13 कोटी 37 लाख 43 हजार 620 रुपये इतकी आहे. तर पत्नीच्या नावे एकूण 17 कोटी 83 लाख 99 हजारांची स्थावर मालमत्ता आहे.

यात प्रामुख्याने ब्रीच कँडी येथील राहत्या घराचा समावेश आहे. हे घर अनिल देसाई आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. शिवाय, अनिल देसाईंवर 76 लाख तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 कोटी 54 लाख रुपयांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे, देसाईंवर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

राहुल शेवाळेंकडे 7 कोटींची संपत्ती

महायुतीमधील शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 1 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. तर पत्नीच्या नावेही 1 कोटी 91 लाख 90 हजार रूपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. शेवाळेंकडे 62 लाख आणि पत्नीकडे 2 कोटी 61 लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे एकूण जंगम मालमत्ता 3.23 कोटींची तर स्थावर मालमत्ता 3.77 कोटींची आहे. त्यांच्याकडे सध्या 85 हजारांची रोख रक्कम असून त्यांच्यावर 1 कोटी 95 लाखांचे तर पत्नीवर 2 कोटी 40 लाखांचे कर्ज आहे.

शिवाय दोघांकडे मिळून प्रत्येकी एक-एक गाडी आहे. त्यांची एकूण मालमत्ता 7 कोटी 90 हजार रूपयांची असून 2019 साली त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 88 लाख रूपयांची होती. गेल्या 5 वर्षात त्यांची संपत्ती 5 कोटी 12 लाख 8 हजार 637 रूपयांनी वाढली आहे. 2012 ला शेवाळे यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढली तेव्हा तर त्यांची संपत्ती केवळ एक लाख असल्याचे शपथपत्र त्यांनी दिले होते, हे विशेष!

2024-04-30T12:01:12Z dg43tfdfdgfd