राज्यात यंदाचा हिवाळा सामान्यपेक्षा कडक राहणार आहे. दिवसा कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढणार असून, रात्री मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील, असा ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिल्लीतून आभासी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यंदाचा पावसाळा हा देशात सर्वत्र चांगला राहिला. जून ते सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा 7.5 टक्के पाऊस झाला. प्रामुख्याने मध्य भारतात पाऊस सर्वाधिक झाला. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत मध्य भारतात किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट राहील. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्टात कडाक्याची थंडी राहील. मात्र, कमाल तपामानात वेगाने वाढ होऊन ते सरासरीपेक्षा जास्तच राहील.
महापात्रा म्हणाले, यंदा मान्सून पाच दिवस उशिरा निघाला. तसा तो किंचित उशिरा परतणार आहे. महाराष्ट्रातून 10 ते 12 ऑक्टोबर, तर देशातून 18 ऑक्टोबरच्या सुमारास परतण्याचा अंदाज आहे. मात्र, अवकाळीचे प्रमाण यंदा सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत 115 टक्के, तर फक्त ऑक्टोबर महिन्यात 112 टक्के पाऊस राहील. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड या भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील.
देशात अवकाळी पावसाचा मुक्काम डिसेंबरपर्यंत राहणार असून, तो ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यातच सुरू होणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे 115 टक्के अवकाळी यंदा बरसेल, असाही अंदाज त्यांनी दिला.
कमाल तापमानात 1 ऑक्टोबरपासूनच चांगली वाढ झाली आहे. मात्र, मान्सून परतण्यास अजून अवकाश आहे. तो राज्यातून 10 नंतर जाईल. त्यानंतर कमाल तापमानात आणखी मोठी वाढ होईल. दिवसा उन्हाचा कडाका, तर रात्री थंडी चागलीच जाणवणार आहे. थंडी ऑक्टोबरच्या दुसर्या आढवड्यात सुरू होऊन डिसेंबरपर्यंत चांगलाच कडाका राहील. मात्र, रात्रीच्या तापमानात अधूनमधून वाढ होण्याची शक्यता आहे.
महापात्रा म्हणाले, देशाच्या काही भागांत यंदा थंडी कमी राहणार आहे. यात पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतात किमान व कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. मात्र, मध्य भारतात थंडी चांगलीच जाणवणार आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अन् महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मान्सून परतताच साधारण 15 ऑक्टोबरपासून थंडी पडेल, असा अंदाज आहे.
2024-10-02T04:57:59Z dg43tfdfdgfd