पुणे : राज्यात मे महिन्यात उष्णतामान चांगलेच वाढले होते. उन्हामुळे नागरिकांची लाही लाही झाली होती. मुंबई आणि पुण्यात यावर्षी तापमानाने उच्चांक गाठला. मात्र, या वाढत्या उकड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर ते दक्षिण असलेला कमी दाबाचा पट्टा विदर्भातून जात आहे. त्यामुळे विदर्भामध्ये पुढील ४८ तासात तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील कमाल तापमान पुढील ४८ तासात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमान वाढण्याची शक्यता आहे.
वाढत्या ता पमानापासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. वातावरण ढगाळ राहून तुरळक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि परिसरात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी ही घट होईल.
राज्यातील इतर भागातही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. सध्या विदर्भ, मराठवाडयामधील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या भागांमधील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र पुढील पाच दिवसांमध्ये इथेही तापमानात कमी होणार आहे.
पुण्यात देखील पुढील काही दिवसांत वातावरण ढगाळ राहणार असल्याने तापमान कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात २५, २६ आणि २७ मे रोजीआकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच २८ ते ३१ मे रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळण्याची शक्यता आहे.
2023-05-26T03:07:27Z dg43tfdfdgfd