SHIVSENA UDDHAV THACKERAY MANIFESTO: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ठाकरे यांनी काय वचने दिली?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘भुताची भीती वाटली की रामाचा जप करतात, तसेच पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यावर आता ते राम राम करू लागले आहेत’, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एनडीएवर प्रहार केला. ‘केंद्रात आधी ‘इंडिया’चे सरकार येईल आणि मग महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर जो काही खड्डा मोदी सरकारने महाराष्ट्रात पाडला आहे, तो भरून काढू. महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देऊ’, असे आश्वासन देणारा वचननामा यावेळी ठाकरे यांनी जाहीर केला.

ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम एक पोकळ इंजिन सरकार करतेय. त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. ‘मला २०१४ मधील किस्सा आजही आठवतो. आम्ही युतीमध्ये होतो, युतीमधील घटक पक्ष म्हणून आम्ही तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो होतो. तो क्षण माझ्या डोळ्यांसमोर आहे. बऱ्याच वर्षांनी देशात एका पक्षाची सत्ता आली होती. त्यामुळे स्वत: राष्ट्रपतीही आश्चर्यचकीत होते. भाजपने त्यावेळी बहुमताच्या आकड्याला स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली. मग २०१९मध्ये ते पुन्हा सत्तेत आले. त्यांनी कलम ३७० काढले, आम्ही तेव्हाही सोबत होतो. आता मात्र त्यांची पाशवी इच्छा समोर आली आहे. त्यांना देशाची घटना बदलण्यासाठी पाशवी बहुमत हवे आहे. देशातील लोकशाही ते मारून टाकतील. ही त्यांची स्वप्ने उघड झाली आहेत’, असा असा दावा ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांची वचने...- महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत. हिरे व्यापार पळवले, क्रिकेटचा सामना पळवला, फिल्मफेअर कार्यक्रम पळवले, सर्वच गोष्टी पळवल्या जात आहेत. महाराष्ट्राचे वैभव लुटले जात आहे. ही लूट आम्ही इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवू

- महाराष्ट्राचे वैभव परत मिळवून देताना आम्ही गुजरातचे काही ओरबाडून घेणार नाहीत. प्रत्येक राज्याला मानसन्मान देऊ

- वित्तीय केंद्र हे नव्याने महाराष्ट्रात उभारू, त्यातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ

- जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून रुग्णालये अद्ययावत केली जातील

- इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल

- शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे निकष बदलेले जातील, खते, बियाणे, अवजारे जीएसटीमुक्त करू, शेतकऱ्यांना हमीभाव देऊ

- महाराष्ट्रातील युवक-युवतींना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातच मिळवून देणार

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T01:37:39Z dg43tfdfdgfd