SATARA NEWS: लग्न जुळवण्यासाठी मुंबईतून गावाला गेला, सातारा-मेढा रोडवर कारच्या धडकेत तरुणाचा करुण अंत

सातारा: सातारा-मेढा रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास जेवण करून शतपावलीसाठी रस्त्यावर चालणाऱ्या मेहुल सुरेश मर्ढेकर (वय २६, रा. ओझरे) याला सातारहून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, मेहुलचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मेहुल मुंबईत एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. चार-पाच दिवसांसाठी तो सुट्टीवर गावाला आला होता. त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती.

याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ओझरे येथील २६ वर्षीय युवक मेहुल सुरेश मर्ढेकर हा रात्री जेवण करून दहाच्या सुमारास सातारा-मेढा रस्त्यावर शतपावली करण्यासाठी डाव्या बाजूने चालत होता. गवळीच्या ओढ्याजवळ सातारा बाजूकडून स्विफ्ट डिझायर (MH 11 BV 9373) या कारने भरधाव वेगाने येऊन मेहुलला जोराची धडक दिली. यात मेहुलचा जागीच मृत्यू झाला. मात्र, ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल रुग्णालयात पाठवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही स्विफ्ट कार केळघर येथील संजय नारायण बेलोशे हा चालवत होता. त्याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले, तसेच हयगय करून भरधाव कार चालवून मेहुल याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेहुलच्या अपघाती निधनाने ओझरे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मेहुल मुंबईत एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. चार-पाच दिवसांसाठी तो सुट्टीवर गावाला आला होता. त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती.

सातारा-मेढा रस्त्याचे काम हे सदोष झाले आहे साईडपट्ट्या कमी ठेवल्या आहेत. गाव, शाळा, वळण याबाबत दिशादर्शक फलक काही ठिकाणी नाहीत. रस्त्याचे काम नवीन झाले असूनही अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. अनेक ठिकाणी खटकी शिल्लक राहिल्या आहेत. ग्लोसाईन रेडियम, रंबलर स्ट्रीप लावल्या नाहीत. अशा सदोष रस्त्यावरूनही वाहने भरधाव वेगाने जात आहेत. गावाजवळ स्पीड ब्रेकर करता येत नसेल तर त्यासारखी दुसरी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाहीतर असेल जीव जातच राहतील, अशी खंत समाजसेवक शिवाजीराव घोरपडे यांनी व्यक्त केली.

2023-05-26T06:46:15Z dg43tfdfdgfd