RAJ THACKERAY SABHA: राज ठाकरेंच्या सभेची तारीख आणि ठिकाण ठरलं, नारायण राणेंसाठी जाहीर सभा!

Raj Thackeray Sabha: लोकसभा निवडणुकीत आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गर्जना होणार आहे. कारण महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची सभा कधी आणि कुठे होणार याची अनेकांना उत्सुकता होता. अखेर राज ठाकरेंच्या पहिल्या सभेची तारीख आणि ठिकाण ठरलं आहे. राज ठाकरे यांची पाहिली सभा 4 मे रोजी कणकवलीमध्ये होणार आहे. महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत.

राज ठाकरेंच्या पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं

गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्त्वाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. आपण फक्त मोदींमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे महायुतीच्या उमेदवरांचा प्रचार देखील करणार असल्याचे समोर आले आहे. याची सुरुवात कणकवलीतील सभेने होत आहे. कणकवलीतील उप रुग्णालयासमोरील मैदानात 4 मे रोजी राजगर्जना होणार आहे.

राज ठाकरे काय बोलणार?

मनसेने रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंची सभा होणार असल्याने या मतदारसंघातील मनसैनिकांमध्ये देखील उत्साह आहे. राज ठाकरेंच्या सभेमुळे राणेंची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या सभेतून राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दोन्ही ठाकरे आमने-सामने येणार

कोकणातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकासघाकडून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना मैदानात उतरवले आहे. नारायण राणे आणि शिवसैनिक यांच्यातील वादामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारार्थ सभा घेणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे त्याच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या मतदारसंघात सभा घेण्याची शक्यता आहे. या सभेतून राज ठाकरे हे थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असली तरी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गची निवडणूक आता ठाकरे-विरुद्ध-ठाकरे अशी होण्याची शक्यता आहे.

2024-04-29T10:55:55Z dg43tfdfdgfd