NASHIK MURDER | पंडित कॉलनीत युवकाचा निर्घृण खून

नाशिक : पंडित कॉलनी परिसरात टोळक्याने पूर्ववैमनस्यातून सफाई कर्मचारी युवकाचा कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. २) सकाळी घडली. आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे (२१, रा. घारपुरे घाट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तीन संशयितांना घेतले असून त्यात अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

आकाश हा नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. १) सकाळी 6 च्या सुमारास पंडित कॉलनी येथून व्ही. एन. नाईक महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मेडिकलबाहेर स्वच्छता करीत होता. त्यावेळी हातात कोयते घेऊन आलेल्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. आकाशने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पायात कुंडी अडकल्याने तो खाली पडला. त्यानंतर संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, गुन्हे शाखा एकचे निरीक्षक मधुकर कड यांची पथके घटनास्थळी गेली. प्राणघातक हल्ल्यानंतर तातडीने पोलिसांच्या श्वानपथकातील 'गूगल' श्वान व अंमलदार गणेश कोंडे यांच्यामार्फत मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. परिसरातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. तसेच तिघांना ताब्यात घेतले. दुपारी आकाशचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर परिसरात तणाव पसरला होता. जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेठमधून तिघे ताब्यात

आकाशवर हल्ला केल्यानंतर मारेकरी पेठच्या दिशेने पसार झाल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे हवालदार विशाल काठे व संदीप भांड यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, काठे, भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांच्या पथकाने पेठ परिसरात जाऊन संशयित अथर्व अजय दाते (२०, रा. घारपुरे घाट), अभय विजय तुरे (१९, रा. रविवार पेठ) यांच्यासह अल्पवयीन संशयितास पकडले.

दोघांमध्ये वाद

आकाश आणि अथर्व यांच्यात तीन ते चार वर्षांपासून वर्चस्ववादामुळे वाद होत असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पोलिसांकडे वादाच्या नोंदीही असल्याचे उघड होत आहे. संशयित अथर्वविरोधात मारहाणप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.

इन्स्टाग्रामवर 'स्टोरी'

संशयित अथर्व दाते हा सहकाऱ्यांसमवेत फरार झाल्यानंतर त्याने दुपारच्या सुमारास इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून आकाशवर हल्ला केल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याचे उघड झाले. 'आदत नही हैं बोलकर दिखाने की, फितरती हैं करके दिखाने की...' असे लिहून मुळशी पॅटर्न चित्रपटातील 'भाजी कापायला आणला का तो कोयता?' हा ऑडिओ डायलॉग त्याने ठेवला होता.

2024-10-02T03:29:20Z dg43tfdfdgfd