NASHIK CITYLINK BUS | आता सिटीलिंकच्या तिकीटावर झळकणार जाहिराती

नाशिक : सिटीलिंकच्या बस तिकिटावर आता जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. इतकेच नव्हे तर, बसमध्ये स्थानकाच्या नावाची घोषणा होताना प्रवाशांच्या कानावर आता जाहिरातीही पडणार आहेत. तोटा कमी करण्यासाठी जाहिरातीतून महसूल मिळविण्याची कल्पना सिटीलिंकने अंमलात आणली आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडील शहर बससेवेचा तोट्यातील पांढरा हत्ती महापालिकेने स्वत:च्या दारात बांधला आहे. ८ जुलै २०२१पासून महापालिकेच्या माध्यमातून 'सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक' शहर बससेवा चालविली जात आहे. अत्याधुनिक, आरामदायी, खिशाला परवडणारे दर, आणि सर्वात महत्वाचे शांत, आल्हाददायक वातावरण असलेल्या या शहराचे प्रदूषण न वाढविणार्‍या सीएनजी बस यामुळे अल्पावधीतच सिटीलिंक बस नाशिककरांच्या पसंतीस उतरली आणि सामान्य नाशिककरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.सद्यस्थितीत रोज लाखो प्रवाश्यांची ने आण सिटीलिंकच्या माध्यमातून होत असते. त्याकरिता २५० बसेस आणि ६९१ बस थांबे नाशिककरांच्या दिमतीला अहोरात्र उभे आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षात या बससेवेतून महापालिकेला सुमारे दीडशे कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी सिटीलिंकतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बसतिकिटावर जाहिराती छापून त्यामाध्यमातून अतिरीक्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न सिटीलिंकतर्फे केला जाणार आहे.

व्यावसायिक संस्थेच्या नावाचीही उद्घोषणा

नाशिक शहरात सिटीलिंकचे ६९१ अधिकृत बस थांबे असून या बसथांब्यांना आपल्या व्यावसायिक संस्थेचे नाव देण्याचीसंधी सिटीलिंकने उपलब्ध करून दिली आहे. बस थांब्याला संस्थेचे नाव देण्याबरोबरच संबधित तिकीटावर देखील स्थानकाबरोबरच संस्थेचे नाव ही छापता येणार आहे. शिवाय संबधित थांबा आल्यास थांब्याबरोबरच व्यावसायिक संस्थेच्या नावाचीही उद्घोषणा करता येणार आहे.

2024-10-02T06:28:03Z dg43tfdfdgfd