MUMBAI MURDER NEWS: वीज बिलाच्या वादामुळे भाडेकरुने उचलले टोकाचे पाऊल, घरमालकाच्या खुनामुळे मुंबई हादरली

Mumbai Murder News: आजकाल खूप क्षुल्लक कारणावरुन लोकांमध्ये वाद होतात. कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की त्यातून विचित्र प्रकार घडतात. मुंबईतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. वीज बिल भरण्यावरून भाडेकरु आणि घरमालकामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, भाडेकरुने घरमालकाचा हातोड्याने खून केला.(Mumbai Crime News) मुंबईतील गोवंडी भागात ही घटना घडली आहे. भाडेकरुने केलेल्या मारहाणीत घरमालक गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांनी घरातून दुर्गंधी यायला लागल्यानंतर घरमालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 63 वर्षीय आरोपी भाडेकरुला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. (Tenant Killed Landlord Over Payment Of Electricity Bill)

नक्की काय आहे प्रकरण ?

गणपती झा (49) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते बैंगनवाडी परिसरात रहायचे. गुरुवारी बैंगनवाडीमधून स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. स्थानिकांनी गणपती झा यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. झा यांचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मृत व्यक्तीचा चुलत भाऊ दिनेश झा याने परिसरात गणपती झा यांच्याविषयी चौकशी केली. त्यावेळी मिळालेल्या माहितीमुळे दिनेश झा यांना धक्काच बसला. वीज बिलावरुन गणपती झा आणि त्यांचे भाडेकरू अब्दुल शेख (63) यांचे भांडण झाले होते. शेखने लाकडी काठी आणि हातोड्याने गणपतीला मारहाण केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर दिनेश झा याने गणपती झा यांचा खून झाल्याबद्दलची तक्रार शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. भाडेकरु अब्दुल शेखला पोलिसांनी अटक केली आहे.

वीज बिलावरून 30 एप्रिलला गणपती व अब्दुल शेख यांच्यामध्ये वाद झाला होता. गणपतीने शेखला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर चिडून शेख जिन्यावर चढला. गणपतीला शेखने लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याला अडवण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने कमरेला लावलेली हाताडी काढली आणि गणपतीच्या तोंडावर मारली. त्यानंतर गणपती गंभीर जखमी झाला होता. तो आपल्या घरी गेला. दोन दिवसांनंतर राहत्या घरात गणपती मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील गिरगाव भागामध्ये सायकल पार्क करण्याच्या वादातून एका व्यक्तीची पिता- पुत्राने हत्या केली होती. त्यानंतर खुनाचे हे दुसरे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतल्या या वाढत्या हत्यांच्या प्रकरणामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

2024-05-07T06:05:51Z dg43tfdfdgfd