MHADA RESERVE FLATS NASHIK | म्हाडासाठी राखीव सदनिकांची परस्पर विल्हेवाट

नाशिक : एक एकरापुढील भूखंडाचा विकास करताना आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के सदनिका द्याव्या लागू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिल्डरांकडून सातबाऱ्याचे विभाजन करून पळवाट काढली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

म्हाडा सदनिका प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली सात अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या सर्व प्रकरणांची तपासणी करून ही समिती जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार असल्याने संबंधित बिल्डर्स, महसूल व महापालिकेच्या नगरनियोजन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

येथील बिल्डरांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने म्हाडासाठी राखीव सदनिकांची परस्पर विल्हेवाट लावून 700 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ट्विट तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जानेवारी २०२२ मध्ये केले होते. या प्रकरणाची तपासणी करताना महापालिकेकडून प्रकल्पांची व सदनिकांची माहिती देण्यास टाळाटाळ गेली गेल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला होता. यासंदर्भात विधिमंडळामध्ये जोरदार चर्चा झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यानंतर महापालिकेच्या नगरनियोजन विभागाने शहरातील एक एकरपेक्षा अधिक मोठ्या क्षेत्रावरील ६५ प्रकल्पांसह ५२ ले-आउटबाबतची प्राथमिक माहिती म्हाडाला दिली होती. या योजनेशी संबंधित ६५ बिल्डरांना नोटिसा देऊन त्यांना या प्रकल्पासंदर्भातील सर्व माहिती म्हाडाला देण्याचे निर्देश दिले होते. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यातच आता नाशिक शहरात एलआयजी, एमआयजी स्किमसाठी २० टक्के क्षेत्र देण्यातून बिल्डरांनी पळवाट काढत, सातबाऱ्याचे विभाजन केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली सात अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे.

अशी आहे चौकशी समिती

बाबासाहेब पारधे (अपर जिल्हाधिकारी) हे या समितीचे अध्यक्ष असून, राजेंद्र वाघ (निवासी उपजिल्हाधिकारी), किशोर काटवटे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा), हेमंत सानप (जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नाशिक), अमोल निकम (तहसीलदार, नाशिक), कल्पेश पाटील (सहा. संचालक, नगरनियोजन, महापालिका), आबासाहेब तांबे, (तहसीलदार) हे सदस्य आहेत.

2024-10-02T05:28:01Z dg43tfdfdgfd