पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
तंबाखू सेवनामुळे श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतो. विशेषतः धूम्रपानाच्या धुराचा परिणाम गंभीर असतो. फुफ्फुसाचा कर्करोग्यांमध्ये ९० टक्के धूम्रपान करणारे आढळले आहेत, असे निरीक्षण फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
कुटुंबातील सदस्यांनाही धुरामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. सिगारेटच्या डबल फिल्टरमधूनही सूक्ष्म कण खोलवर फुफ्फुसात जातात. धूम्रपानापासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला तळेगावच्या टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या एमडी रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ ज्योती मेहता यांनी दिला आहे.
धूम्रपान मुक्तीनंतर, १२ आठवड्यांच्या आत रक्ताभिसरण सुधारते. यामुळे चालणं आणि धावणं यांसारख्या क्रिया सहजपणे करता येतात. मानसिक तणाव कमी होतो. नऊ महिन्यांपर्यंत फुफ्फुसांची क्षमता १० टक्क्यांपर्यंत सुधारते.
खोकला कमी होतो आणि श्वासही सहजतेनं घेता येतो. वयाच्या विशी तिशीत धूम्रपानाचा परिणाम जाणवत नाही. परंतु वाढत्या वयानुसार फुफ्फुसांची क्षमता कमी होते. मोठ्या वयात फुफ्फुसांची क्षमता चांगली असणं म्हणजे निरोगी वृद्धावस्थेचं द्योतक आहे. स्मोकर्स कफ पासून सावधानताधूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा सकाळी खोकला येतो.
त्याला 'स्मोकर्स कफ' असं म्हणतात. धूम्रपान हे दुहेरी शस्त्रासारखं आहे. धूम्रपानामुळे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि मग ते रोगजंतू तुमच्या अधिकच्या खोकल्यातून पुढे मोठ्या प्रमाणात पसरवण्याची शक्यताही जास्त वाढते.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, तंबाखू किंवा सिगरेटसारखे तंबाखूजन्य पदार्थ हे फुफ्फुसांचा कर्करोगास कारणीभूत ठरतात. एखादा धूम्रपान करत असेल तर त्याच्या आसपासच्या व्यक्तींच्या शरीरातही तो धूर जात असतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हटलं जातं.
सिगरेट ओढणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची किंवा त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत १५ ते ३० पट जास्त असते. दिवसातून काहीच सिगरेट्स ओढल्या किंवा अधूनमधून ओढल्या तरीही हा कर्करोग होऊ शकतो. मात्र दीर्घकाळ आणि मोठ्या प्रमाणात सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीला अधिक धोका असतो.
2024-10-02T10:13:19Z dg43tfdfdgfd