LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे, बारामतीत प्रचार थंडावणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे/पिंपरी : पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यामध्ये आज, रविवारी काँग्रेसने विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित केली असून, सायंकाळी शशी थरूर यांचा युवकांशी संवाद पार पडणार आहे. मावळसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अभिनेता गोविंदाची प्रचारफेरी आणि सभा होणार आहे. शिरूरसाठी हडपसरमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे.

बारामती मतदारसंघासाठी मंगळवारी (सात मे) मतदान होणार आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघाचा प्रचार आज, रविवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी सायंकाळी सांगता सभेचे आयोजन केले आहे. यामध्ये अनुक्रमे शरद पवार आणि अजित पवार सहभागी होणार आहेत.

पुणे, मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांसाठी पुढील सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आज शेवटचा रविवार उपलब्ध आहे. त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी जाहीर सभा आयोजित न करता उमेदवारांकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज, रविवारी बाइक रॅली होणार आहे. या रॅलीत अभिनेता गोविंदा सहभागी होतील. रॅली संपल्यानंतर गोविंदा यांची सभाही होणार आहे.

पुण्यातल्या उमेदवारांचा प्रचारावर भर

प्रचारातील शेवटच्या रविवारचे निमित्त साधून पुण्यातील उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विविध समाजघटकांच्या मेळाव्यांबरोबरच कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघांतील प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरही रविवारी वडगाव शेरी आणि पुणे कँटोन्मेंट या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पदयात्रा काढणार आहेत.

प्रकाश आंबेडकरांचीही सभा

शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची हडपसर येथे आज, रविवारी (पाच मे) जाहीर सभा होणार आहे. हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयाच्या पटांगणात सांयकाळी पाच वाजता ही सभा होईल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T08:15:29Z dg43tfdfdgfd