LEOPARDS | देवळाली प्रवरात बिबट्याचा मुक्तसंचार!

राहुरी : पुढारी वृत्तसेवा

राहुरी परिसरामध्ये बिबट्याने मुक्त उच्छाद मांडला आहे. रात्रीसह दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असताना वन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने राहुरी वन विभागाचा सावळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अवैध वृक्ष तोड करणार्‍यांकडून तळी भरून घेण्यापेक्षा बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देवळाली प्रवरा येथील नागरीकांनी वनपाल युवराज पाचारणे यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच पालिका प्रशासनानेही दक्षता घेण्याबाबत निवेदन देण्यात आले.

राहुरी परिसरात बिबट्याचे मानवी हल्ले घडल्यानंतरही राहुरी वन विभागाचा दुर्लक्षितपणा जैसे थे आहे. रात्र-दिवसा बिबट्या मानवी वस्त्यांवर दर्शन देत आहेत. बिबट्यांमुळे राहुरी परिसरात दहशत वाढत चालली आहे.

राहुरी वनपाल पाचारणे यांनी कारभार हाती घेतल्यापासून वन विभाग म्हणजे अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी चराऊ कुरण बनल्याची चर्चा आहे. नुकतेच देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध समस्याप्रश्नी सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी विकास नवाळे व राहुरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पाचारणे यांचे लक्ष वेधले.

देवळाली प्रवरा परिसरातील वाड्या वस्त्यावर बिबट्याने अक्षरक्षा: धुमाकूळ घातला असून या ठिकाणी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावे, अशी मागणी देवळाली प्रवरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने अधिकारी युवराज पाचारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच डॉ. तनपुरे कारखाना कामगार कॉलनीतील वाढलेले गवत व तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून देवळाली नगर परिषदेने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी,

अशी मागणी माजी नगरसेवक डॉ.संदीप मुसमाडे, राजमुद्रा ग्रुपचे प्रशांत मुसमाडे, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज, माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस, युवराज लहामगे,विनोद कडू, निखिल गोपाळे,किरण चव्हाण, सिद्धार्थ साळुंके आदींनी केली.

2024-10-02T08:13:01Z dg43tfdfdgfd